नागपूर : ग्रामीण भागात नि:शुल्क आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांना आता महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून (एमएमसी) ‘क्रेडिट पॉईंट’ दिले जाणार आहे. त्याबाबत एका मानक कार्यप्रणालीवर काम सुरू आहे. या अंमलबजावणीनंतर शहरातही नि:शुल्क आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांबाबतही या पद्धतीच्या ‘क्रेडिट पॉईंट’बाबत विचार होणार आहे. या नावीन्यपूर्ण योजनेबाबत आपण जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एमएमसी’मध्ये नोंदणीकृत डॉक्टरांना त्यांच्या नोंदणीच्या नूतनीकरणासाठी दर पाच वर्षांनी ३० ‘क्रेडिट पॉईंट’ मिळवावे लागतात. त्यासाठी दरवर्षी किमान सहा ‘क्रेडिट पॉईंट’ आवश्यक आहे. डॉक्टरांनी विविध वैद्यकीय संबंधित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतल्यास त्यांना ‘क्रेडिट पॉईंट’ मिळतात. ‘एमएमसी’ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच एक विनंती पत्र दिले. त्यानंतर ‘एमएमसी’ने ग्रामीणला नि:शुल्क सेवा देणाऱ्या डॉक्टरांना ‘क्रेडिट पॉईंट’बाबतच्या मानक कार्यप्रणालीवर काम सुरू केले आहे.

‘एमएमसी’च्या सदर उपक्रमामुळे केवळ ग्रामीण रुग्णांनाच फायदा होणार नाही तर डॉक्टरांनाही त्याचा लाभ होईल. या नवीन प्रणालीअंतर्गत वैद्यकीय शिबिरे आयोजित करणारी रुग्णालये किंवा धर्मादाय संस्था ‘एमएमसी’ला किमान तीन तास मोफत सेवा देणाऱ्या डॉक्टरांची माहिती देतील. यामुळे त्यांना ‘क्रेडिट पॉईंट’ मिळण्यास मदत होईल. मुख्यमंत्र्यांच्या पत्रात वैद्यकीय क्षेत्रात सुधारणेसह या क्षेत्रातील व्यावसायिकांना स्वयंसेवेत अधिक सहभागी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून एमएमसीच्या ‘क्रेडिट पॉईंट’ व्यवस्थेत सुधारणेची विनंती केली आहे. याच्या अंमलबजावणीनंतर शहरातही नि:शुल्क सेवा देण्याबाबत काही ‘क्रेडिट पॉईंट’वर काम करता येईल काय? त्याबाबतही एमएमसीकडून विचार होणार आहे.

राज्यात नोंदणीकृत डॉक्टरांची संख्या किती?

राज्यात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे सुमारे १ लाख ९० हजार नोंदणीकृत डॉक्टर आहेत. या सगळ्या डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून क्यू आर कोडद्वारे ओळख देण्याच्या योजनेवरही काम सुरू आहे. हा क्यूआर कोट स्कॅन केल्यास कुणालाही डॉक्टरांनी पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम कुठून केलासह सगळी माहिती उपलब्ध होऊ शकेल. या क्यू आर कोडद्वारे बोगस डॉक्टरांवरही निंत्रणाची शक्यता आहे.

शहरातही नि:शुल्क सेवा देणाऱ्या डॉक्टरांसाठी…

‘एमएमसी’ लवकरच ‘क्रेडिट पॉईंट’ बाबतची एक नवीन प्रणाली सुरू करणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर त्याबाबतच्या मानक कार्यप्रणालीवर काम सुरू आहे. या प्रणालीमुळे ग्रामीणला काम करण्याबाबत डॉक्टरांना प्रोत्साहन मिळेल. ग्रामीणनंतर शहरातही या पद्धतीने काही करता येईल काय, त्याबाबत विचार होईल, असे महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, मुंबईचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांनी सांगितले.