यवतमाळ : समाजातील माणसा-माणसांमधील जिव्हाळा आटत असताना येथील ‘ओलावा’ पशुप्रेमी संघटनेने मुक्या जनावरांना मायेचा ओलावा देवून आपलेसे केले आहे. समाजात एकीकडे परदेशी जातीचे व महागडे श्वान पाळण्याचे फॅड असताना ओलावा संस्थेने घेतलेल्या दत्तक शिबिरात चक्क मोकाट श्वनांच्या देशी जातीच्या पिल्लांना हक्काचे घर मिळाले आहे.
पूर्वी विशिष्ट कालावधीत श्वानांना पिल्ल झालेली दिसत. मात्र हल्ली बाराही महिने श्वानांना पिल्लं होत असल्याचे दिसते. त्यामुळे शहरात मोकाटा श्वानांची संख्या प्रचंड वाढली आहे. उन्हाचा पारा ४३ वर गेला असतानाही शहरातील अनेक भागांत मोकाट श्वानांना पिल्लं झालेली आहे. ही पिल्लं कधी वाहनांखाली तर कधी आजाराने मरतात. काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की, एकही पिल्लू जगत नाही. या श्वानांना ना राहायला घर आहे ना त्यांना वेळोवेळी खायला मिळते. अशा मोकाट प्राण्यांकरिता ओलावा पशुप्रेमी संस्था मागील तीन वर्षांपासून काम करीत आहे. मोकाट श्वानांच्या पिल्लांना हक्काचे घर मिळवून देण्याकरिता ओलावा पशुप्रेमी संस्थेतर्फे नुकतेच मोफत श्वान दत्तक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अनेक लोकांनी भेट देवून श्वानाच्या पिल्लास दत्तक घेतले. २७ श्वानांच्या पिल्लांपैकी १८ श्वानांना यावेळी हक्काचे घर मिळाले. लोक मादी श्वानांपेक्षा नर श्वानांना प्राधान्य देत असल्याने मादी श्वानांबद्दल असलेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न या शिबिरात करण्यात आला. श्वान नर अथवा मादी असले तरी ते सारखेच काम करते, त्यामुळे मादी श्वानांनाही हक्काचा निवारा मिळावा यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आावाहन यावेळी आयोजकांनी केले. शिबिरात श्वान दत्तक घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस श्वानाची काळजी कशा प्रकारे घ्यावी, त्याचे लसीकरण कसे करायचे याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा – “आमच्यावर सरकारचा राग का?”; संतप्त ओबीसींचा नागपूरच्या संविधान चौकात ठिय्या
ओलावा पशुप्रेमी संस्थे मार्फत दत्तक श्वानास रेबीज लसीकरण मोफत करून देण्यात आले. या दतक शिबिरास ओलावा पशुप्रेमी संस्थेचे अध्यक्ष डॉ.आलोक गुप्ता, सुरेश राठी, घनश्याम बागडी, दीपक बागडी यांच्यासह डॉ. पूजा कळंबे, सुमेध कापसे, तेजस भगत, प्रथमेश पवार, हर्षवर्धन मुद्दलवार, भूषण घोडके, कृष्णा गंभीरे, राजश्री ठाकरे, श्वेता चंदनखेडे, कार्तिक चौधरी, कपिल टेकाम, पवन दाभेकर, मयंक अहिर, कैलाश पटले, आशय नंदनवार, रिया लांडे आदी उपस्थित होते.