नागपूर : वन्यजीव क्षेत्रांतील गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी लवकरच ‘स्निफर डॉग’ तैनात केले जाणार आहेत. महाराष्ट्रातील पेंचसह देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये या श्वानांना तैनात केले जाणार आहे. ११ श्वान आणि त्यांना हाताळणाऱ्या २२ व्यक्तींना हरियाणा येथील पंचकुला येथे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वन्यजीव गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी ‘स्निफर’ श्वानचे प्रशिक्षण आता एक महत्त्वाचा टप्पा पार करणार आहेत. पंचकुला येथील ‘बेसिक ट्रेिनग सेंटर-इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स’ (बीटीसी-आयटीबीपी) शिबिरात ११ तरुण श्वान आणि त्यांना हाताळणाऱ्या २२ व्यक्तींच्या नवीन तुकडीचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडिया’ आणि ‘ट्रॅफिक’च्या या उपक्रमाअंतर्गत आता वन्यजीव क्षेत्रातील ‘स्निफर’ श्वानांची संख्या १०५ होईल. बेल्जियम मालिनॉईस जातीचे सहा ते नऊ महिन्यांचे तरुण श्वान आणि त्यांना हाताळणाऱ्या व्यक्ती सुमारे सात ते आठ महिने प्रशिक्षण घेतील. या प्रशिक्षणात त्यांना वन्यजीव क्षेत्रातील गुन्हे शोधून त्यावर अंकुश ठेवण्याचे कौशल्य शिकवले जाणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर वन्यजीव ‘स्निफर’ श्वान पथके महाराष्ट्रासह उत्तराखंड, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगालच्या वन विभागात सामील होतील. ‘सुपर स्निफर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ट्रॅफिक आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडियाच्या कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षक वन्यजीव ‘स्निफर’ श्वान पथके तस्करांकडून प्रतिबंधित वन्यप्रजाती जप्त करण्यात आणि शिकाऱ्यांना पकडण्यात यशस्वी झाले आहेत. 

हेही वाचा >>>संतनगरी शेगावात अवतरली पंढरी! ‘श्रीं’च्या पालखीची मंदिर परिक्रमा; कार्तिकीनिमित्त लाखावर भाविकांनी घेतले दर्शन

तस्करींचा माग..

पोलीस खात्यात ज्याप्रमाणे मादक द्रव्ये आणि स्फोटकांचा शोध या श्वानांद्वारे घेतला जातो, त्याचप्रमाणे त्यांच्या वास घेण्याच्या क्षमतेचा वापर करून विविध वन्यजीव प्रजाती, त्यांचे अवयव आणि त्यांच्या तस्करीचा माग घेतील. यात वाघ, हत्ती, गेंडे, हरणांचे मास, जिवंत पक्षी, साप, सािळदर, कासव आदी वन्यजीवांचा समावेश असल्याचे ‘ट्रॅफिक’चे सहयोगी संचालक डॉ. मेरविन फर्नाडिस यांनी सांगितले, तर भारतातील वन्यजीव गुन्हेगारी प्रतिबंध आणि शोध यासाठी ‘स्निफर’ श्वानांना प्रशिक्षण देण्याचा हा महत्त्वाचा कार्यक्रम २००८ मध्ये दोन श्वानांसह सुरू करण्यात आला होता. २०२२ अखेपर्यंत या कार्यक्रमांतर्गत ९४ वन्यजीव ‘स्निफर’ श्वानांना प्रशिक्षित आणि तैनात करण्यात आले, असे डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडियाचे वरिष्ठ संचालक डॉ. दीपंकर घोष यांनी सांगितले. वन्यजीव गुन्हेगारी मोठय़ा गुन्ह्यांपैकी एक आहे. वन्यजीवांच्या भविष्याचे रक्षण करण्यासाठी या गुन्ह्यांना आळा घालणे आवश्यक असल्याचे बीटीसी-आयटीबीपी, पंचकुलाचे महासंचालक म्हणाले.

कुठे तैनात करणार?

महाराष्ट्रात पेंच व्याघ्रप्रकल्प आणि उत्तराखंडमध्ये कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पात तीन वन्यजीव ‘स्निफर’ श्वान पथके, राजाजी व्याघ्र प्रकल्पात एक पथक, झारखंडमध्ये पलामू व्याघ्र प्रकल्प, ओडिशात सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पात दोन पथके, छत्तीसगडमध्ये अचानकमार व्याघ्र प्रकल्पात दोन पथके, पश्चिम बंगालमध्ये बक्सा व्याघ्र प्रकल्पाद्वारे दोन पथके तैनात केली जाणार आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dog teams to detect crimes in tiger reserves training started at panchkula in haryana amy