यवतमाळ : पुराने जीवन कसे उद्ध्वस्त होते, याचा अंगावर शहरा आणणारी घटना यवतमाळला उघडकीस आली. पुरामुळे गर्भातच डोळे मिटलेल्या बाळाचे मृत्यूपश्चात श्वानांनी लचके तोडल्याची संतापजनक घटना यवतमाळच्या दत्त चौक परिसरात घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील सावरखेडा येथील गर्भवती प्रियंका वैभव पवार, ही डिलिव्हरीची मुदत पूर्ण होऊनही पुरामुळे वेळेत रुग्णालयात पोहोचू शकली नाही. चार दिवसांनंतर ती यवतमाळातील सम्यक रुग्णालय, दत्त चौक येथे दाखल झाली. याच दवाखान्यात प्रियंका नियमित उपचार घेत होती. डॉक्टरांनी तिला २५ जुलै रोजी रुग्णालयात दाखल होण्याचे सांगितले. याच काळात सर्वत्र पावसाचा जोर वाढल्याने रस्ते बंद होते. त्यामुळे प्रियंकाने चार दिवस घरीच कळा सोसल्या. रस्ता सुरू झाल्यानंतर २९ जुलै रोजी ती यवतमाळ येथे रुग्णालयात पोहोचली. डॉ. रजनी कांबळे यांनी सर्वप्रथम या महिलेची सोनोग्राफी केली. त्यात बाळ दगावल्याचे आढळून आले.

हेही वाचा – भंडारा : रेती तस्करांनी केली निलज बु. गावातील पांदण रस्त्याची दुरवस्था; चिखलमय रस्त्याने शेतकरी त्रस्त

हेही वाचा – उपमुख्यमंत्र्यांची ‘ती’ घोषणा अन् राज्यातील मुख्याध्यापक पेचात; म्हणतात, “फेरविचार करावा”

मातेची सुरक्षा पाहता उपचार सुरू केले. रविवारी रात्री १२.३० वाजता महिलेची नॉर्मल प्रसूती झाली. सव्वातीन किलो वजनाच्या मुलाला जन्म दिला, मात्र ते मूल जन्मतःच मृत होते. या दुःखात नातेवाईक व आई होती. रुग्णालयाने बाळाचा मृतदेह नातेवाईकांकडे दिला. सोमवारी सकाळी हे नातेवाईक आपल्या गावी जाण्याच्या तयारीत असताना दवाखान्याच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांनी अचानकपणे नवजात बाळाचा मृतदेह पळविला. हा प्रकार लक्षात आलेल्या नातेवाईकांनी कुत्र्यांचा पाठलाग करून बाळाचा मृतदेह सोडविला. मात्र, तोपर्यंत कुत्र्यांनी बाळाचे लचके तोडले होते. त्याचा एक पाय शरीरापासून वेगळा केला होता. या घटनेने प्रचंड हादरलेले नातेवाईक बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन गावी निघून गेले. या घटनेची पोलिसात कुठलीही नोंद झाली नव्हती. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dogs attack on dead baby who died in the womb nrp 78 ssb
Show comments