यवतमाळ : जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांसाठी दुसऱ्या टप्प्यात रविवारी झालेल्या निवडणुकीत चार बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने आपले वर्चस्व कायम ठेवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालकमंत्री संजय राठोड यांच्यासाठी वर्चस्वाची लढाई ठरलेल्या दारव्हा बाजार समितीत शिवसेना शिंदे गटाने १८ पैकी १६ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळविली. राष्ट्रवादीच्या सोबतीने बोरी अरब (ता. दारव्हा) येथेही शिंदे गटाने सत्ता राखली.

हेही वाचा – वर्धा : माजी आमदाराची नाचक्की; बाजार समितीत दोन जागांवर पराभव

मारेगाव, कळंब, झरी, राळेगाव येथे काँग्रेस आणि महाविकास आघाडीने एकतर्फी सत्ता मिळविली. घाटंजी येथे पारवेकर गट व भाजपाने, तर आर्णी येथे काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता राखली. पालकमंत्री संजय राठोड आणि काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाचे असलेल्या दारव्हा बाजार समितीत पालकमंत्री राठोड यांनी विजयाचा झेंडा रोवला. दिग्रस बाजार समितीत झालेल्या पराभवाचा वचपा राठोड यांनी दारव्हा आणि नेर बाजार समिती राखून काढला.

दारव्हा बाजार समितीत शिंदे गटाने १६ जागा मिळविल्या, तर महाविकास आघाडीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. बोरी अरब (ता. दारव्हा) बाजार समितीत शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीने १३ जागांवर विजय मिळविला. विरोधी काँग्रेस आणि भाजपाला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. येथे निवडणुकीपूर्वी तीन जागांवर शिवसेना-राष्ट्रवादीचे उमदेवार अविरोध निवडून आले होते. मारेगाव बाजार समितीत महाविकास आघाडीने १६ जागा जिंकल्या. भाजपाने ग्रामपंचायत गटातून एक जागा जिंकली. एका जागेवर आघाडीचे उमेदवार यापूर्वीच अविरोध निवडून आला होता. झरी बाजार समितीत काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार व शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने एकहाती सत्ता राखली. येथे १८ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले.

कळंब बाजार समितीतही काँग्रेसने सर्व १८ जागांवर विजय मिळविला. काँग्रेसचे माजी मंत्री वसंत पुरके व प्रवीण देशमुख यांच्या गटाने ही निवडणूक एकत्रितपणे लढविली होती. राळेगाव बाजार समितीतही काँग्रसने १४ जागा जिंकून वर्चस्व कायम राखले. भाजपासह इतर सर्व पक्षांना चार जागा मिळाल्या. येथे काँग्रेसने महाविकास आघाडीत न लढता स्वतंत्र निवडणूक लढली.

हेही वाचा – ‘बार्टी’चे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू ठेवण्यासाठी आजपासून उपोषण

घाटंजी येथे माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर व भाजपा गटाने १८ पैकी १० जागांवर विजय मिळविला. येथे माजी मंत्री शिवाजीराव मोघे व लोणकर गटास आठ जागा मिळाल्या. आर्णी बाजार समितीत काँग्रेसचे शिवाजीराव मोघे आणि राष्ट्रवादीचे ख्वाजा बेग यांच्या नेतृत्वात काँग्रेस-राष्ट्रवादीने १२ जागांवर विजय मिळविला. येथे शिवसेना ठाकरे गटाने पाच जागा राखल्या, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला.

जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात सात बाजार समित्यांमध्ये सर्वच राजकीय पक्षांना संमिश्र कौल मिळाल्यानंतर रविवारी झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत महाविकास आघाडीने वर्चस्व मिळविल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा अंदाज राजकीय वर्तुळात लावला जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dominance of mahavikas aghadi on market committees in yavatmal district guardian minister sanjay rathod win darwha nrp 78 ssb
Show comments