नागपूर : उत्तरप्रदेशमध्ये फिल्म सिटी होणार की नाही ते माहीत नाही. मात्र मुंबईमध्ये ५२१ एकर जमिनीवर जगातील सर्वात चांगली व अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली फिल्म सिटी तयार करणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मुनगंटीवार शुक्रवारी नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत चित्रपटसृष्टीतील मान्यवरांशी चर्चा केली. मात्र मुंबईतील चित्रपटसृष्टी उत्तरप्रदेशला जाणार यात काही तथ्य नाही. मुंबईत अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली फिल्म सिटी आपण तयार करतोय, असेही त्यांनी सांगितले.
चित्रिकरणाच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना
मुंबई विमानतळावर येणाऱ्या पर्यटकांसाठी व्यवस्था विकसित करण्याचा विचार आहे. विमानतळाजवळ १०४ स्केअर किमीचा पार्क आहे, त्याला विकसित करणार आहे. फिल्म सिटी येथेच राहावी, चित्रपट निर्माते इतर ठिकाणी जाऊ नये यासाठी प्रयत्न करतो आहोत. त्यासाठी एक खिडकी योजना आणली आहे आहे. चित्रिकरणाच्या परवानगीसाठी आता वन क्लिकवर सर्व ना हरकत प्रमाणपत्र मिळणार आहेत. राज्यात चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ६५ पर्यटन स्थळ विकसित करणार असून त्या ठिकाणी सोयी सुविधा निर्माण केल्या जातील. चित्रीकरणासाठी काश्मीरला जाण्याची गरज राहणार नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले. पद्मश्री पोपरे यांचे इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये भाषण थांबवले, हे मला माहिती नाही. पण सरकारी कार्यक्रमात राजकीय बोलू नये, टीकात्मक सुर ठेऊ नये. धोरणात्मक बोलले पाहिजे असेही मुनगंटीवार म्हणाले.