अमरावती : संपूर्ण महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो, की शासनाच्या दबावाला बळी पडून प्रशासनाच्या अधिकारांचा गैरवापर करू नका. आमच्या कुटुंबीयांवर विनाकारण कारवाई करणार असाल, तर तुम्ही तुमच्या मुला-बाळांचा विचार करा, असा थेट इशारा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे. आयकर विभाग, इडी असो किंवा महसूल विभाग, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे ध्यानात ठेवावे की तुम्हालाही मुले-बाळे आहेत. अधिकाऱ्यांनी सरकारच्या दबावाला बळी पडून चुकीच्या पद्धतीने कारवाई करायला नको, असे नितीन देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
अकोला जिल्ह्यातील दहीहांडाचे जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांनी शेतातील रस्ता अडविल्याच्या तक्रारी होत्या. या तक्रारीहून त्यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठवला होता. त्यांनी हा प्रस्ताव नियमबाह्य ठरवत परत पाठविला. मात्र आयुक्तालयातील उपायुक्त कवडे यांनी तो परत विभागीय आयुक्तांसोबत चर्चा न करता व त्यांची स्वाक्षरी न घेता परस्पर शासनाला पाठवला. या मुद्दयावर आमदार नितीन देशमुख यांनी विभागीय आयुक्तालयावर शेतकऱ्यांसह धडकले.
हेही वाचा >>> अजित पवारांची खेळी? मुख्यमंत्र्यांच्या खात्यालाच निधी नाही; अडीच हजार वसतिगृह अनुदानाविना
यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान विभागीय आयुक्तांनी शासनाला उपायुक्त कवडे यांनी पाठविलेला प्रस्ताव चुकीचा असल्याचे मान्य करून संबंधित अधिकाऱ्यांविरद्ध कारवाई करण्याचे आश्वासन आमदार देशमुख यांना दिले. जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्या विरुद्ध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली कारवाई करण्यात आल्याचा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला. मात्र अशा नियमबाह्य कारवाईस आम्ही जुमानणारे नसून अन्यायाविरुद्ध लढत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.