नागपूर : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या आरोपीला विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी मरेपर्यंत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आतिश दिनेश यादव (५२, रा. गोंडघाट, पालनगर, कन्हान), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. १९ ऑक्टोबर २०१८ रोजी आरोपीने अकरा वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला पालनगर गोंडगाव येथील नाल्याजवळ नेले. तिने प्रतिकार केला असता आरोपीने मारहाण केली. यात ती बेशुध्द झाली असता आरोपीने तिच्यावर अत्याचार केले.
यानंतर पीडित मुलगी ही बेशुध्दावस्थेत नाल्यात आढळून आली होती. तिला लागलीच सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पीडिता ही दीड महिना रुग्णालयात भरती होती. शुध्दीवर आली असता पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला. त्यावरून कन्हान पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. न्यायालयात एकूण १९ साक्षीदार तपासण्यात आले.
दोन्ही बाजू ऐकूण न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३६३ , २३५ (२) मध्ये पाच वर्षांचा कारावास, तीन हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावास, कलम ३0७ , २३५ (२) मध्ये जन्मठेप, पाच हजार रूपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कारावास, कलम ३८७ , कलम २३५ (२) मध्ये जन्मठेप तसेच पाच हजार रूपये दंड, दंड न दिल्यास सहा महिने कारावास, अशी शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे अॅड. आसावरील पळसोडकर यांनी बाजू मांडली.