भंडारा : मागील काही दिवसांपासून बोरा बॅण्ड या ऑनलाइन ट्रेडिंग साईटवर पैसे गुंतवणूक केल्यास ४० दिवसांमध्ये पैसे दुप्पट होतात, अशा चर्चांना भंडारा शहरात उधाण आले होते. शहरातील बहुतांश युवकांनी बोरा बॅण्ड या ऑनलाइन साईटवर पैसे गुंतवल्याचे निदर्शनास आले आहे. काही दिवसांपासून बोरा बॅण्ड ही ऑनलाइन ट्रेडिंग साईट बंद झाली असून गुंतवणूकदारांचे पैसे विड्रॉल होत नसल्याने भंडारा शहारात बोरा बॅण्ड ऑनलाइन साईटचा प्रचार व प्रसार करून गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करून देण्याचे प्रलोभन देणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहे.
किशोर कुंभारे, तकिया वार्ड भंडारा आणि विक्की झाडे रा. आंबेडकर वार्ड भंडारा यांनी गुंतवणुकदारांचे नमूद ऑनलाइन ट्रेडिंग साईटवर पैसे गुंतवणूक करून घेतले, परंतु सध्या बोरा बॅण्ड ही ऑनलाइन साईट बंद झाल्याने गुंतवणूक दारांचे पैसे विड्रॉल होत नसल्याने गुंतवणूकदारांनी पैसे परत मिळवण्यासाठी किशोर कुंभारे व विक्की झाडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पैसे परत मिळवून देण्यास असमर्थता दर्शवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची तक्रार पवनकुमार दादाराम मस्के रा. विद्यानगर भंडारा यांनी भंडारा पोलीस ठाण्यात केली आहे. महाराष्ट्र ठेवीदारांचा (वित्तीय हितसंबधाचे संरक्षण) अधिनियम १९९९ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा – २५ प्रवाशांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली ‘ती’ बस पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावे
सदर प्रकरणी आरोपी नामे किशोर सुधाकर कुंभारे यांस अटक करण्यात आली असून आरोपी विक्की झाडे सध्या फरार आहे. भंडारा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही कारवाई लोहित मतानी पोलीस अधीक्षक, भंडारा, ईश्वर कातकडे अप्पर पोलीस अधीक्षक भंडारा, उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात भंडारा पोलिसांनी केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद गिरी हे करीत आहे.
हेही वाचा – मेळघाटात वनरक्षक भरतीसाठी सासू धावली सूनेच्या मदतीला
पोलीस ठाण्यात तक्रार करा
कोणत्याही अमिषाला बळी पडू नका. तसेच ज्यांची गुंतवणूक करून फसवणूक झाली असेल त्यांनी ताबडतोब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी केले आहे.