नागपूर : गेल्या काही दिवसांपासून उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून एकाच दिवशी कुख्यात गुन्हेगार भावंडांनी दोघांचा भरचौकात खून केला. वसंतराव नाईक झोपडपट्टीत घडलेल्या या हत्याकांडामुळे उपराजधानीत एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मण राजेश गोडीया (२४) आणि सागर शंकर मसराम (२५) अशी खून झालेल्या युवकांची नावे आहेत. चंद्रशेखर ऊर्फ चंदू इरपाते आणि त्याचा भाऊ पंकज इरपाते अशी आरोपींची नावे आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे सीताबर्डीत पुन्हा गँगवॉर सुरु झाल्याचे समोर आले आहे. गुन्हेगारांनी वर्चस्व प्रस्थापित केल्यामुळे गृहमंत्र्यांच्या शहरात चाललंय तरी काय? असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू बेग हा कुख्यात गुन्हेगार असून तो एका हत्याकांडातून काही दिवसांपूर्वीच जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता. मात्र, तो न्यायालयात हजर न झाल्याने त्याचा पकड वारंट निघाला होता. यादरम्यान, तीन दिवसांपूर्वी पंकज इरपाते याच्यासोबत वस्तीतील वर्चस्वावरुन अजीज बेगशी वाद झाला होता. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती. त्यामुळे चिडलेल्या पंकजने अजीजची तक्रार पोलीस ठाण्यात करण्याची धमकी दिली होती. पोलिसांत प्रकरण गेल्यास सीताबर्डी पोलीस अटक करतील आणि मध्यवर्ती कारागृहात डांबतील, अशी भीती अजीजला होती. त्याने आपले साथिदार तडीपार आरोपी सागर मसराम आणि लक्ष्मण गोडी यांना पंकजची समजूत घालण्यास पाठविले होते. मात्र, सागर आणि लक्ष्मण हे दोघेही मारण्यासाठी येत असल्याची माहिती पंकज आणि त्याचा भाऊ चंदू यांना मिळाली.
सापळा रचून केला खून
सागर आणि लक्ष्मण हे दोघेही गुन्हेगार होते. ते पंकजच्या वस्तीत आले. त्यामुळे पंकज व त्याचा भाऊ चंदू यांनी एका गल्लीत दोघांनाही अडवले. चंदू दोघांशी बोलत असताना पंकजने मागून दोघांवरही लोखंडी रॉडने हल्ला केला. सागरच्या डोक्यात रॉडचा मार बसल्यामुळे तो जागीच ठार झाला तर गंभीर जखमी लक्ष्मण याचा उपचारादरम्यान आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला.
दोन्ही आरोपींना अटक
अजीजला नुकताच सीताबर्डी पोलिसांनी अटक केली होती. पंकजने पोलिसांना दिलेल्या टीपवरुनच पोलिसांनी अटक केल्याचा संशय अजीजला होता. त्यामुळे अजीज चिडला होता. लक्ष्मण आणि सागर हे दोघेही अजीज बेग याच्यासाठी काम करायचे. त्याने दोघांनाही पंकजला धडा शिकविण्यासाठी पाठवले होते. मात्र, पंकज आणि चंदू इरपाते यांनी लक्ष्मण आणि सागरचाच काटा काढला. या हत्याकांडातील दोघांनाही पोलिसांनी अटक केली.