लोकसत्ता टीम
नागपूर : गुरुवारी रात्री वाठोडा पोलीस ठाणे हद्दीतील साईबाबानगरमध्ये पैशाच्या कारणावरून एका मित्राने दोघांचा खून केला. या घटनेमुळे उपराजधानी हादरली असून पोलिसांनी चार आरोपींना अटक करण्यात यशही मिळवले आहे. विशेष म्हणजे, नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी गुरुवारीच पदभार स्वीकारला.
सनी धनंजय सरूडकर (३३) रा. जलालपुरा, गांधीबाग आणि कृष्णकांत भट (२४) रा. श्यामधाम मंदिरजवळ, नंदनवन असे दोन्ही मृतांची नावे आहेत. तर किरण शेंडे (३०), योगेश शेंडे (२५) दोन्ही रा. साईबाबानगर आणि इतर दोन अशी आरोपींची नावे आहेत. किरण आणि योगेश हे पारडीतील ऑटोडील्स मोटर डिलरकडे कामाला होते. ते साईबाबानगरात भाड्याने राहत होते. तर मृत कृष्णकांत आणि सनी हे दोघेही फायनान्सचे काम करीत होते. तसेच ते इतरांना व्याजानेही पैसे देत होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींचा किरण हा मित्र होता. त्यामुळे आरोपींनी किरणला दुचाकी घेण्यासाठी पैसे व्याजाने दिले होते. काही महिने किरणने नियमित व्याजाचे हप्ते भरले. मात्र, त्यानंतर त्याने ते पैसे भरणे बंद केले. त्यामुळे कृष्णकांत आणि सनी हे दोघेही त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावायचे. मात्र, किरण त्यांना वारंवार टाळत होता. गुरुवारी किरणने त्यांना रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास साईबाबा येथील घरी पैशाच्या वाद मिटवण्यासाठी बोलावले. तिथे आल्यावर कृष्णकांत आणि सनी यांनी त्याला व्याजाचे पैसे आणि फायनान्सचेही हप्ते मागितले. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे किरण, त्याचा लहान भाऊ योगेश व त्यांच्या दोन साथीदारांनी दोघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. लाकडी दांड्याने मारहाण केल्याने दोघांचाही मृत्यू झाला. घटनेनंतर चौघे आरोपी पसार झाले. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत या प्रकरणात गुन्हा दाखल करत शिताफीने चार आरोपींना अटक केली.