लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड वनविभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत दोघांना वाघाच्या कातड्यासह अटक करण्यात आली आहे.

गुप्त माहितीवरून कर्मचारी व वनाधिकाऱ्यांनी २९ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजता एटापल्ली-जीवनगट्टा मार्गावर ही कारवाई केली असून शामराव रेमश नरोटे (३०, रा. वासामुंडी) आणि अमजद खान पठाण (३७, रा. एटापल्ली) अशी आरोपींची नावे आहेत. त्यामुळे एटापल्ली जंगल परिसरात काही दिवसांपूर्वी दिसून आलेल्या वाघाची शिकार झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

आणखी वाचा-सराफा व्‍यावसायिकाच्‍या हत्‍येचे गूढ उकलले, गवंडीकाम करणारा निघाला मारेकरी

एटापल्ली तालुक्यात वाघाच्या कातडत्याची तस्करी संदर्भात महाराष्ट्र-छत्तीसगड वनविभागाला काही दिवसांपासून गुप्त माहिती मिळत होती. माहितीची खात्री केल्यानंतर २९ नोव्हेंबररोजी पहाटे ३ वाजता दोन्ही राज्याच्या वनविभागाने एटापल्ली-जीवनगाट्टा मार्गावर सापळा रचला. दरम्यान, एका मोटारसायकलवर दोन व्यक्ती संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले. त्यांच्यावर संशय आल्याने वनाधिकाऱ्यांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी मोटार सायकलचा वेग वाढवून पळ काढला. सदर मोटारसायकलचा पाठलाग वनकर्मचाऱ्यांनी करीत त्यांना पकडले. त्यांची कसून तपासणी केली असता एका प्लास्टिक पिशवीत वाघाचे कातडे आढळले. तेव्हा वन कर्मचाऱ्यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले व वनकायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

आणखी वाटा-वर्धा : अल्पवयीन मुलीचे अपहरण, आरोपी सापडला साताऱ्यात

महिनाभरापूर्वी एटापल्ली तालुक्यातील मवेली परिसरात वाघाने बैलाची शिकार केली होती. मात्र, त्यांनतर त्याभागात वाघाची कुठलीही हालचाल दिसून आलेली नाही. त्यामुळे या वाघाची शिकार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, दोन्ही आरोपींची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती उपवनसंरक्षक शैलेशकुमार मीणा यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास भामरागड वन विभागाचे उपवनसंरक्षक शैलेशकुमार मीणा, सहायक वनसंरक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनात एटापल्लीचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी सी.सी. भेडके करीत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doubt of tiger was hunted in etapalli area ssp