भंडारा : एरव्ही विजबिलाची वसुली करण्यासाठी महावितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी अत्यंत तत्परता दाखवत ग्राहकांच्या दारात पोहोचतात. मात्र, दारातच असलेला जीवघेणा रोहित्र (डीपी) या अधिकाऱ्यांना दिसत नसल्याने नागरिकांमधून आता संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील रमाबाई आंबेडकर दलीत वस्तीत घराच्या दारात यमदूत बनून उभा असलेला महावितरणचा रोहित्र मागील कित्येक वर्षांपासून एका कुटुंबाच्या जिवावर उठला आहे. हा रोहित्र हटविण्याच्या मागणीसाठी मागील ७ वर्षांपासून पीडित कुटुंब महावितरण कंपनीच्या कार्यालयात चपला झिजवत आहे, मात्र आजतागायत रोहित्र हटविण्यात आलेले नाही. एखादी अनुचित घटना घडल्यावरच महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग येणार का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
पावसाळ्यात धोकादायक रोहित्र जिवावर उठल्याच्या अनेक घटना घडत असतात. या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीचा हा निष्काळजीपणा कळसच ठरतो आहे. एकीकडे विद्युत पुरवठा खंडित झाल्यास कंपनीकडून प्रतिसाद दिला जात नाही, वीज ग्राहकांच्या सोयी सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, अनेक प्रकारचे कर लादून भरमसाठ देयक ग्राहकांच्या माथी मारले जाते, तर दुसरीकडे सामान्य जनतेच्या जीविताशी खेळ सुरू असल्याचे चित्र शहराच्या दलित भागात दिसत आहे.
शहराच्या दलित व गजबजलेल्या वसाहतीत या पीडित कुटुंबाच्या अगदी दरात रोहित्र उभारले असून यासंबंधी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. मात्र त्याकडे महावितरणने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. याबाबत महावितरण कंपनीच्या भंडारा शाखेचे कार्यकारी अभियंता जयस्वाल यांना विचारणा केली असता, लोकांनी रोहित्राजवळ घरे बांधू नयेत, असे उत्तर दिले. यामुळे महावितरण कंपनीच्या कार्यप्रणालीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
हेही वाचा – ‘पावसाक्षरं’मध्ये सजली पावसाची विविध रूपे
दरम्यान, आम्ही मागील अनेक वर्षांपासून येथे राहत आहोत. रोहित्रामुळे आमच्या कुटुंबाला धोका असल्याने सात वर्षांपासून आम्ही महावितरण कंपनीकडे वारंवार तक्रारी केल्यात. मात्र आमच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. आमच्या कुटुंबीयांच्या जीवितास कोणताही धोका झाल्यास त्याला पूर्णतः महावितरण कंपनीचे अधिकारी जबाबदार असतील, असा इशारा पीडितांनी दिला आहे.