वर्धा: शिक्षण क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली असल्याने वेगळ्या पर्यायाची गरज निर्माण झाली असून त्यावर वर्धा शिक्षण व्यवस्था हेच उत्तर आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द समाजसेवी डॉ.अभय बंग यांनी केले आहे.
लोकनेते प्रा.सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवी कृतज्ञता वर्षानिमित्त ‘शिक्षणाची समस्या आणि वर्ध्याच्या उपाय’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत डॉ.बंग बोलत होते. आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर प्रा.सुरेश देशमुख व सतीश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.अभय बंग यांनी पुढे वर्धा शिक्षण व्यवस्थेचा परिचय दिला. ते म्हणाले की या जिल्ह्यात शिक्षणाचे ऐतिहासिक भांडार फार मोठे आहे. त्याचा विसर पडला. अनेक क्रांतीकारी शैक्षणीक प्रयोग या जिल्ह्यात झाले. महात्मा गांधींनी सुरू केलेली नई तालीम ही एक शिक्षण व्यवस्थाच होय. भारताला मिळालेली ही माेठी देणगी होय. बुध्दी, भावना आणि कौशल्य याचा मेळ त्यात आहे. शिक्षण मुक्त असायला पाहिजे. त्याला अनुभवाशी जोडता आले पाहिजे. त्याचे प्रात्यक्षीक करता आले पाहिजे. तरच अंगी असलेल्या कौशल्याचा विकास होतो. आत्मभान येते. असे अनेक प्रयोग गांधी व विनोबाजींनी शिक्षण क्षेत्रात केले होते.
हेही वाचा… शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा! विरोधकांची मागणी; चहापानावर बहिष्कार
गरज ओळखून शिक्षण मिळाले तर बेरोजगारीसारख्या समस्यांचे निर्मूलन होते. जीवन हेच शिक्षण होय. वर्धा शिक्षण व्यवस्था म्हणूनच पर्याय ठरतो, असे डॉ.बंग यांनी स्पष्ट केले. आमदार डॉ.शिंगणे यांनी सुरेश देशमुख यांच्यासोबत असलेल्या संबंधांना उजाळा दिला. शिक्षण, सहकार, शेती आणि राजकारण या क्षेत्रात प्रा.देशमुख यांनी केलेल्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. उपक्रमाची भूमिका व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ.विलास देशमुख यांनी दिला. प्रारंभी प्रा.प्रमोद नारायणे यांनी रचलेले व प्रा.अरूणा हरले यांनी संगीतबध्द केलेले लोकनेता हे गीत सादर करण्यात आले. सतीश राऊत यांनी आभार मानले. शहरातील डॉ.उल्हास जाजु , डॉ.विभा गुप्ता, स्वाती देशमुख, डॉ.तारक काटे, समीर देशमुख व विविध क्षेत्रातील मान्यवर या व्याख्यानास हजर होते.