लोकसत्ता टीम
नागपूर : उत्तर नागपुरातील इंदोरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे श्रेणीवर्धन करून ६१५ रुग्णशय्येच्या अतिविशेषोपचार रुग्णालयाला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु, विद्यमान सरकार ही संस्था उत्तर नागपुरातून इतरत्र पळवण्याचा घाट रचत आहे. तातडीने संस्थेचे बांधकाम सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा, डॉ. आंबेडकर रुग्णालय बचाव समितीकडून देण्यात आला आहे.
टिळक पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत समितीतर्फे वेदप्रकाश आर्य (राष्ट्रवादी काँग्रेस), दिनेश अंडरसहारे (रिपाई-सेक्युलर), वामन सोमकुंवर (सामाजिक कार्यकर्ता) उपस्थित होते. समितीने स्पष्ट केले की, हे रुग्णालय शासन वर्धा रोडवर हलवण्याचे षडयंत्र रचत आहे. परंतु, या निर्णयाविरुद्ध उत्तर नागपुरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटले आहेत. उत्तर नागपुरातील कन्व्हेंशन सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. परंतु, त्यानंतर काहीच झाले नाही. येत्या हिवाळी अधिवेशनात डॉ. आंबेडकर रुग्णालयासंदर्भात सकारात्मक भूमिका न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही समितीने दिला. पत्रकार परिषदेला सुरेश पाटील (काँग्रेस), मंगला पाटील (बीआरएपी), इफ्तेखार अंसारी (वज्मे जुल्फेकार मुस्लीम सोसायटी), संजय फुलझेले (आझाद समाज पार्टी), विजय त्रिवेदी (भीम योद्धा सेना), विजय भैसारे (महाराष्ट्र पदवीधर संघटन), डॉ. दिलीप कांबळे (डॉक्टर्स असोसिएशन), उमेश बोरकर (मनसे) उपस्थित होते.
आणखी वाचा-राज्यात रविवारपासून थंडीचा जोर वाढणार!
संस्थेचा प्रवास…
वैद्यकीय शिक्षण खात्याने १५ ऑगस्ट २००४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे काम सुरू केले. तीन टप्प्यात रुग्णालयाचा विकास होणार होता. मात्र, येथे आजही बाह्यरुग्ण विभागाशिवाय (ओपीडी) काहीही नाही. २०१९ मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत येथे पदव्युत्तर व अतिविशेषोपचार अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली. १० मार्च २०२२ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात येथील खर्चाच्या तरतुदीची अर्थसंकल्पात घोषणा केली. परंतु, पुढे काहीच झाले नाही. नवीन प्रस्तावानुसार, रुग्णालयातील ११ अतिविशेषोपचार विभाग आणि त्याच्या अखत्यारित ६१५ रुग्णशय्या राहणार होत्या. येथे १७ विशेषोपचार अभ्यासक्रम, श्रेणीवर्धनासाठी १ हजार १६५ कोटी ६५ लाख रुपये मंजूर होते.