५० तालुक्यांमध्ये मुलींसाठी वसतिगृहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जवळून संबंध आलेल्या ठिकाणांना पर्यटन ठिकाणे म्हणून विकसित करून त्या ठिकाणी काम करणाऱ्या अनुसूचित जातीतील महिलांसाठी वसतीगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या अंतर्गत मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन शहरांची निवड करण्यात आली आहे.
२०१५-२०१६ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती वर्ष असून महाराष्ट्र सरकार एकात्मता आणि सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करीत आहे. यासाठी १२५ कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले असल्याची माहिती राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान पुरवणी मागण्यांमध्ये १२५ कोटी रुपयांच्या तरतुदीसाठी मंजुरी देण्यात आली होती. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शाहू महाराज यांची भाषणे आणि त्यांचे साहित्य प्रकाशित केले जाईल, असेही ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानमध्ये ५० तालुक्यांमध्ये मुलींकरिता ५० वसतिगृहे उभरण्यात येणार आहेत. स्थानिक दलितांच्या विकासाच्या दृष्टीने ही रूपरेखा आखण्यात आली आहे. मुंबईतील इंदू मिल्सच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती उभारण्यासाठी भूमिपूजन येत्या एक-दोन महिन्यात करण्यात येईल. लंडनमध्ये शिक्षण घेत असताना आंबेडकरांचे वास्तव्य असलेले घर सरकारने ताब्यात घेतले असून खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विविध जातींच्या १२५ व्यक्तींना सामाजिक न्याय, समानतेच्या विषयावर एम.फील व पीएच.डी. देण्यात येईल. डॉ. आंबेडकरांच्या १२५व्या जन्मदिनानिमित्त वर्षभर विविध कार्यशाळा, चर्चासत्रे आयोजित करण्यात येतील, अशीही माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr ambedkar related gardens development
Show comments