प्रबोध देशपांडे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला : संकटात असलेल्या माणसाला आधार देण्यासाठी अनेक हात पुढे सरसावतात. मात्र, मूका जीव संकटात अडकल्यावर त्याला त्यातून बाहेर कोण काढणार? त्याची काळजी कोण घेणार? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात. जखमी किंवा आजारी प्राण्यांना बेवारस सोडून त्यांचे अधिक हाल केले जातात. हे चित्र पालटणे आवश्यक आहे. जखमी व बेवारस प्राण्यांच्या भावना समजून घेत त्यांना देखील आधार देण्याची खरी गरज आहे, असे मत देशातील पहिले अपंग प्राण्यांचे अनाथालय ‘पाणवठा’चे संस्थापक डॉ. अर्चना व गणराज जैन यांनी व्यक्त केले.

अकोल्यात एका कार्यक्रमाच्यानिमित्ताने आले असता त्यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला. गणराज जैन म्हणाले, २००५ पासून प्राण्यांसाठी काम करीत आहे. २०१२ मध्ये कोब्रा नागाने चावा घेतल्याने सात दिवस अत्यावस्थेत रुग्णालयात होतो. त्यानंतर मिळालेले आयुष्य केवळ प्राण्यांसाठी देण्याचा आम्ही दोघांनीही निर्णय घेतला. अगोदर सफर नावाने प्राण्यांसाठी मोफत उपचार केंद्र चालवले. त्या उपचार केंद्राचे प्राण्यांच्या अनाथाश्रमामध्ये परिवर्तन केले. देशातील हे पहिले अपंग प्राण्यांचे अनाथालय आहे. आता आश्रमात १०७ प्राणी आहेत. त्यात गाय, घोडे, गाढव, माकड, कुत्रे, मांजरी, मोर अशा सर्वच प्रकारच्या प्राण्यांचे वास्तव्य आहे. वनविभाग देखील अपंग प्राणी आश्रमात आणून ठेवतात. आतापर्यंत आश्रमात साडेचार हजार प्राणी येऊन गेलेत. त्यांची देखभाल व उपचार करण्याची संधी ईश्वराने आम्हाला दिली, हे आम्ही भाग्य समजतो.

आणखी वाचा-नागपूर: विद्यार्थिनीचा मृत्यू अर्ध्या पाणीपुरीने कसा झाला? मेडिकलच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

मूळचे महाड येथील आम्ही आहोत. अनेकवेळा प्राण्यांना कायमचे अपंगत्व येते, त्यांचे नेमके पुढे काय? त्यांना सांभाळणारी एखादी संस्था आहे का? याचा शोध घेतला. केवळ अपंग प्राण्यांचे अनाथाश्रम कुठे नसल्याचे लक्षात आले. जखमी, अपंग प्राण्यांची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने महाड सोडून मुंबईच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बदलापूर येथे पाच वर्षांपासून अपंग प्राण्यांचे अनाथालय सुरू केले. या अनाथलयाला शासनाची कुठली मदत किंवा अनुदान नाही. डॉ. अर्चना एमडी डॉक्टर असल्याने त्यांच्या ‘प्रॅक्टीस’मधून मिळणारे उत्पन्नातून अपंग प्राण्याचे अनाथालय चालवले जाते. समाजातील दातृत्वातून काही प्रमाणात मदत होते. हे अनाथालय उभारणीसाठी डॉ. अर्चना यांनी गळ्यातील मंगळसूत्रासह घरातील साहित्य देखील विकले. अनाथलयाचे कार्य करतांना आर्थिक अडचणी तर येतातच. शिवाय मानव व निसर्ग निर्मित विविध समस्यांचा देखील सामना करावा लागतो, अशी खंत गणराज जैन यांनी व्यक्त केली. अपंग प्राण्यांचा सांभाळ करण्यासाठी समाज तयार होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

‘बेडरुम’मध्ये मगर अन् खांद्यावर घार

महाड येथे जेसीबीमुळे मगरीच्या तोंडाला जखम झाली होती. उपचार करतांना तिला ठेवण्याची व्यवस्था नसल्याने घरातील ‘बेडरुम’मध्ये ठेवले. १५ दिवस उपचारादरम्यान तिने आम्हाला आपलेसे करून घेतले. राधा म्हणून घारीवर आठ महिने उपचारानंतर सोडल्यावर ती जाईच ना, आम्ही दोघे घराबाहेर पडताच ती आमच्या खांद्यावर येऊन बसत होती. आमच्या खांद्यावर उमटलेले तिच्या नखांचे व्रण व्रण आजही कायम आहेत. प्राण्यांना प्रेमांने १०० टक्के दिले तर ते आपल्याला २०० टक्के परत देतात, असे अनेक अनुभव आल्याचे गणराज जैन म्हणाले.

आणखी वाचा-महिला डॉक्टर अंघोळ करताना दुसऱ्याकडून व्हिडीओ रेकॉर्डिंग.. मेडिकलमध्ये नेमकं काय घडलं?

‘सर्वकार्येशु सर्वदा’तून मिळाले बळ

‘लोकसत्ता’ वृत्तपत्राच्या ‘सर्वकार्येशु सर्वदा’ उपक्रमातून २०१९ मध्ये ‘पाणवठा’ अनाथाश्रमाचे कार्य समाजापुढे मांडल्या गेले. सर्वदूर अनाथाश्रमाचे कार्य पोहोचले. या उपक्रमातून अनाथाश्रमासाठी १५ लाख रुपयांवर मदत मिळाली. पुरामुळे आलेल्या संकटातून अनाथाश्रम नव्याने उभे राहण्यासाठी ‘लोकसत्ता’चा हा उपक्रम मोठा आधार ठरला, असे गणराज जैन यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr archana and ganaraj jains first orphanage for disabled animals in the country ppd 88 mrj
Show comments