काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले ज्येष्ठे नेते शशी थरूर हे पक्षाला सध्याच्या स्थितीतून व कार्यपद्धतीतून बाहेर काढण्यासाठी एकमेव पर्याय असल्याचा दावा करीत त्यांना विजयी करण्याचे आवाहन काँग्रेस नेते व माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी केले आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि ‘जी-२३’ गटाचे खासदार डॉ. शशी थरूर या दोन काँग्रेस नेत्यांमध्ये थेट लढत होत आहे.
हेही वाचा >>> चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
२४ वर्षांनंतर गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान होऊ इच्छित आहे. पक्षात विकेंद्रीकरणासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. विदर्भातून त्यांनी प्राचाराचा श्रीगणेशा केला. पक्षाला नवी दिशा दाखवण्याची क्षमता थरूर यांच्यात आहे. पक्षाला सध्याच्या स्थितीतून व कार्यपद्धतीतून बाहेर पडण्यासाठी डॉ. शशी थरूर हेच एकमेव पर्याय आहेत, मोदी जाळातून बाहेर निघण्यासाठी ते ‘गेम चेंजर’ ठरतील, मी स्वत: महाराष्ट्रात फिरून डॉ. शशी थरूर यांच्या विजयाचे आवाहन करणार असल्याचे देशमुख यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.