अकोला : गत काही वर्षांपासून हवामान बदल एक जागतिक समस्या म्हणून समोल आली आहे. त्याचे अनेक दुष्परिणाम दिसून येत आहेत. प्रदूषण आणि हवामान बदल रोखण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक देश एकत्र येऊन काम करणे ही जमेची बाजू असल्याचे मत कर्नाटक राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय परिसंवादात हवामान बदलावर मंथन करण्यात आले.
स्व.वसंतराव नाईक स्मृतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘शेती प्रणालींच्या पुनरुज्जीवनासाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. शरद गडाख होते. यावेळी राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण संस्थेचे संचालक डॉ. एन.जी. पाटील, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, राष्ट्रीय तण संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. जे. एस मिश्रा, सेंद्रिय शेती संशोधन संस्थेच्या संशोधक डॉ. आकांक्षा सिंग आदींसह देश विदेशातील मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
तापमानात सातत्याने वाढ होत आहे. बदलत चाललेल्या निसर्ग चक्रामुळे कीड, रोगांचा उपद्रव वाढला. दुष्काळ, पूर आणि बरेच काही वातावरणातील अनपेक्षित बदलाचा हवामान आणि पर्यावरणावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतांना दिसतो. वन्यजीव, शेती आणि मानवी आरोग्य यासारख्या विविध बाबींवर दुष्परिणामांची व्याप्ती मोठी आहे. भविष्यात बदलत्या जागतिक परिस्थितीत देशांतर्गत शेती शाश्वत राहण्याची गरज डॉ. दलवाई यांनी व्यक्त केली.
विद्यापीठाद्वारे शेतकऱ्यांच्या हितासाठी संशोधन निरंतरपणे सुरू असून यामध्ये विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांचा देखील सहभाग घेतला जातो. शाश्वत शेतीविकासासाठी एकात्मिक प्रयत्नांची गरज आहे. राष्ट्रीय परिसंवादामधून राज्यासह देशांतर्गत शेती क्षेत्राला बदलत्या जागतिक हवामानाच्या परिस्थितीत शाश्वत करण्यासाठी सखोल चर्चा, सादरीकरण, संशोधनात्मक लेख आदींच्या माध्यमातून भरीव असे निष्कर्ष निघतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केला. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ. नितीन कोंडे यांनी, तर डॉ. अनिता चौरे यांनी आभार मानले. राष्ट्रीय परिसंवादात पर्यावरणाच्या विविध विषयांवर सत्रांमध्ये संशोधकांनी सादरीकरण केले.
२०० प्राध्यापक, संशोधकांचा सहभाग
राष्ट्रीय परिसंवादात २७४ संशोधनात्मक लेख प्राप्त सादर करण्यात आले. या परिसंवादामध्ये भारतासह विदेशातील शेती क्षेत्रात कार्यरत २०० हून अधिक संशोधक, प्राध्यापक, विस्तारकर्मी, विद्यार्थी सहभागी झाले आहेत.