नागपूर : शिक्षण मंचाचा विद्यापीठातील वाढता प्रभाव हा केवळ देखावा आहे. २०१६च्या विद्यापीठ कायद्याने निवडणुकीऐवजी नामनिर्देशित सदस्यांची संख्या वाढवली. त्यामुळे एकाच विचारधारेचा प्रभाव असणाऱ्या कुलगुरू आणि राज्यपालांनी पात्र नसलेल्या आपल्या विचाराच्या लोकांना नियुक्त्या केल्या. आम्ही सत्तेपुढे कधीही गुलाम होत नाही. त्यामुळे अशा शक्तीच्या विरोधात लढा उभारण्यासाठी सर्व संघटनांना एकत्र घेत विद्यापीठ प्राधिकरणांच्या सर्व जागांवर उमेदवार देत असल्याचे डॉ. बबनराव तायवाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी आमदार ॲड. अभिजीत वंजारी उपस्थित होते.

नागपूर विद्यापीठातील विविध घटकांचे नेतृत्व करणाऱ्या यंग टीचर्स असोसिएशन, सेक्युलर पॅनल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर टिचर्स ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त महाआघाडीच्या वतीने विधिसभेच्या शिक्षक, प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी आणि विद्वत परिषदेसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. अनेक दिग्गजांना महाआघाडीने उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा: खाऊ घालण्यासाठी श्वानांना दत्तक घेण्याची गरज नाही!; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

विद्यापीठ शिक्षणात सामाजिक समता, विचारस्वातंत्र, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय व बंधुभाव ही मूल्ये स्थापन करण्यासाठी महाआघाडी स्थापन करण्यात आल्याचे तायवाडे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी नवीन शिक्षण धोरणाचा निषेध केला. हे धोरण गरिबांचे उच्च शिक्षण धोक्यात आणणारे आहे, असा आरोपही केला. विद्यापीठामध्येही तज्ज्ञ व्यक्तींना डावलून केवळ विशिष्ट विचाराच्या व्यक्तीला पद दिले जात असल्याने याविरोधातच आमचा लढा असल्याचे तायवाडे म्हणाले. या पत्रकार परिषदेला पूरणचंद्र मेश्राम, ॲड. मनमोहन वाजपेयी उपस्थित होते.

Story img Loader