चंद्रपूर : इयत्ता दुसरी ते बारावीपर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमात, विशेषतः बालभारती तसेच युवक भारतीच्या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र शिकवण्यात यावे, अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षणमंत्री केसरकर यांनी तत्काळ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र (एस.सी.ई.आर.टी.) या संस्थेच्या संचालकाला बाबासाहेबांचे जीवनचरित्र अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशाला सर्वसमावेशक अशी राज्यघटना लाभली. बाबासाहेबांच्या प्रयत्नांमुळेच अनेकांना मोठी संवैधानिक पदे देखील प्राप्त करता आली. समाजातील शेवटच्या घटकाला हक्काचे शिक्षण घेता आले. परंतु, आधुनिक भारतात जीवन जगत असताना आजच्या पिढीला किंवा एकूणच भारतीयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर खरंच कळले का? असा प्रश्न सर्वांनाच पडत असतो. आधुनिक भारताच्या निर्मितीसाठीचे त्यांचे कार्य भारतीय जनतेला न कळल्यामुळे भारतीयांची हानीच झालेली आहे. त्यामुळे आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी अभ्यासक्रमात बाबासाहेबांचे जीवन व कार्य शिकवले जाणे आवश्यक आहे, असे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या लक्षात आणून दिले.
यामध्ये डॉ. बाबासाहेबांचे चरित्र, ऐतिहासिक कार्य, विविध क्षेत्रातील संघर्ष, सशक्त भारत निर्मितीसाठीचे कार्य, महिलांच्या उन्नतीसाठी योगदान, ल़ोकशाही मजबुतीसाठी योगदान, तळागाळातील घटकांसाठीचे योगदान, आधुनिक भारत निर्मितीसाठी धरण निर्मिती, उद्योग व शेतीसाठी पाण्याचे नियोजन, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी संघर्ष, भारतीय संविधान निर्मितीतील बाबासाहेबांचे योगदान व आपले संविधान, बाबासाहेबांचे समाज सुधारणाविषयक विचार, आर्थिक सुधारणाविषयक विचार तसेच अन्य विषयांचा समावेश शालेय पुस्तकात करण्याची विनंती केली. शिक्षणमंत्र्यांनी ही मागणी रास्त असून तत्काळ अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. दरम्यान, ‘एक राज्य, एक अभ्यासक्रम, एक जिल्हा व एक गणवेश‘ धोरण राबवण्याबाबत देखील सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या वेतनात वाढ करण्याचे देखील आश्वासन यावेळी केसरकर यांनी दिले.