डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे विद्यापीठाशी संलग्नीकरण नाही; विद्यार्थ्यांना मन:स्ताप
‘टॉपर्स’ महाविद्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाने विद्यापीठाशी संलग्नीकरणाची औपचारिकता पूर्ण न केल्याने शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पूर्वसंध्येला हॉल तिकीट न मिळाल्याने मन:स्ताप सहन करावा लागला.
नागपुरातील नावाजलेले महाविद्यालय असे श्रेय लाटण्यात अग्रेसर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा तोंडावर येऊन ठेपली असतानाही हॉल तिकीट न मिळाल्याने ते कासावीस झाले. दीक्षाभूमी परिसरात कला, वाणिज्य, समाजविज्ञान आणि विधि या विद्याशाखांची महाविद्यालये आहेत, मात्र इतके दिवस व्यवस्थापनाने संलग्नीकरणासाठी प्रक्रिया पूर्ण केली नाही. आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेकडे दुर्लक्ष करून परीक्षेच्या आदल्यादिवशी धावपळ केल्याने महाविद्यालय व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा चव्हाटय़ावर आला. केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील, एसटी आणि लोहमार्गाने प्रवास करणारे विद्यार्थी या महाविद्यालयात आहेत. परीक्षा, अभ्यासक्रम, हॉल तिकीट या माहितीसाठी ही मुले त्यांच्या शहरी मित्रमैत्रिणींवर अवलंबून असतात. परीक्षेच्या तीनचार दिवसाआधी मुले बिनधास्त होती. मंगळवारी सकाळी नऊ वाजता पेपर असतानाही हॉल तिकीट न मिळाल्याने आज सोमवारी सायंकाळपर्यंत मुलांना भीतीने ग्रासले. त्यांनी विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्राचार्य यांच्याकडे विचारपूस केली. मात्र, आपल्याच नव्हे तर सर्वच महाविद्यालयांची हीच समस्या असल्याचे सांगून महाविद्यालयात विद्यार्थ्यांची बोळवण करण्यात आली.
विद्यार्थ्यांना हॉल तिकीट न मिळाल्याची विचारणा प्रकुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे केली असता महाविद्यालयाचे संलग्नीकरणच नसल्याची गंभीर बाब समोर आली. संलग्नीकरण नसलेले हे एकच महाविद्यालय असल्याने त्यांच्याच विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले नाही, असे डॉ. येवले म्हणाले. परीक्षेच्या तोंडावर नव्हे तर आधीच संलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज असताना केवळ चालढकल केल्याने विद्यार्थ्यांना आधी हॉल तिकीट मिळू शकले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी हॉल तिकिटासाठी महाविद्यालयात, विद्यापीठात शोधाशोध करण्यासाठी दिवस गमवावा लागल्याची खंत अनेक विद्यार्थ्यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली.
यासंदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद पवार म्हणाले, विद्यापीठाने काही कागदपत्रे मागितली होती. आमच्याकडे शासनाचे कागदपत्रे आहेत. मात्र, विद्यापीठाला विद्यापीठाची कागदपत्रे हवीत. एकदोन कागदपत्रे कमी पडल्याने त्यांनी आतापर्यंत संलग्नीकरण दिले नव्हते. मात्र, तीन लिपिक विद्यापीठात गेले असून येत्या अध्र्या तासात संलग्नीकरण मिळेल, असा विश्वास सोमवारी दुपारी त्यांनी व्यक्त केला.
‘टॉपर्स’ महाविद्यालयात परीक्षेच्या गांभीर्याचा अभाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे विद्यापीठाशी संलग्नीकरण नाही
Written by मंदार गुरव
First published on: 24-11-2015 at 01:43 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr babasaheb ambedkar college lack of affiliation with university