नागपूर : उत्तर नागपुरातील कामठी रोडलगत ग्रेन गोडाऊनचे जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘कन्व्हेंशन सेंटर’ उभारण्याचे अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या एक-दीड महिन्यात त्याचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. या ‘कन्व्हेंशन सेंटर’मुळे एक चांगले सभागृह तसेच विविध सुविधा असलेले केंद्र उपलब्ध होऊन उत्तर नागपुरात जनतेची सोय होणार आहे.
‘कन्व्हेंशन सेंटर’ची पाच मजली अतिशय देखणी इमारत तयार झाली आहे. यामध्ये बेसमेंट आणि तळमजल्यावर वाहनतळ सुविधा आहे. पहिला मजल्यावर भोजन कक्ष, स्वयंपाकघर, व्यापार केंद्र, संमेल सभागृह, माध्यम केंद्र, बैठक कक्ष, तीन अद्यापत कक्ष, बँक, रोकड खोली, एटीएम, लॉकर कक्ष, व्यवस्थापक कक्ष आहे. दुसऱ्या मजल्यावर फाऊंडेशन ऑफिस, बैठक कक्ष, तीन कक्ष, उपाहारगृह आहे. तिसऱ्या मजल्यावर सार्वजनिक ग्रंथालय, ई-ग्रंथालय, बुद्धिस्ट स्टडिज डिव्हीजन, बैठक कक्ष, संचालक कक्ष आहे.
चौथ्या मजल्यावर सभागृह आणि बालकनी, प्रकाश कक्ष, ध्वनी कक्ष, रंगभूषा कक्ष, उपाहारगृह, कला दालन, श्रोता दालन, अतिथीगृह, निवास कक्ष आहे. तर पाचव्या मजल्यावर प्रशिक्षणगृह, नोंदणी कार्यालय, १० अतिथी कक्ष आहेत. या प्रकल्पाला सप्टेंबर २०१४ रोजी ११३.७४ कोटी मंजूर झाले. सामाजिक न्याय विभागामार्फेत कन्व्हेंशन सेंटर उभारण्यात आले. तर नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एनएमआरडीए)त्यांचे बांधकाम केले. आतापर्यंत या प्रकल्पावर ११२.६६ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
तिसऱ्या मजल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ४० फूट उंच पुतळा बसवण्यात येणार आहे. तो पुतळा लवकरच बसण्यात येईल. तसेच इतर किरकोळ काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधातांना नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी आज पाहणी दौऱ्यात दिल्या. ते म्हणाले, २०१४ ला निधी मंजूर झाला. करोना काळात कामाची गती संथ आली. पण, गेल्या वर्षभरात अतिशय वेगाने काम करण्यात आले. या प्रकल्पाचे लोकार्पण एक-दीड महिन्यात व्हावे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही सूर्यवंशी म्हणाले.
कोराडी मंदिरात ‘सेंट्रल प्लाझा’
महालक्ष्मी जगदंबा संस्था, कोराडी या तीर्थस्थळाचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात ‘पर्यटन केंद्र’ (१३.१३ कोटी), मंदिर परिसरातील उर्वरित काम (१.८५ कोटी), तसेच प्रशासकीय मान्यतेव्यतिरिक्त ‘सेंट्रल प्लाझा’ व अतिमहत्वाच्या लोकांसाठी वाहनतळाचे काम (५.४९ कोटी) सुरू आहे.
दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाचे काम मार्चपासून
दीक्षाभूमी स्मारकाचे सौंदर्यीकरण व विस्तारीकरण करण्यात येणार आहे. हे दोन टप्प्यात केले जाणार आहे. त्यासाठी २००.३१ कोटी खर्च अपेक्षित आहे. तर दुसऱ्या टप्प्यात १८१.१०८ कोटी खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यासाठीचे ४० कोटी प्राप्त झाले असून आणखी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी मात्र दीक्षाभूमीच्या लगतच्या कृषी विभागाच्या जमिनीचे अधिग्रहण करावे लागणार आहे. पहिल्या टप्प्याच्या कामाला मार्च महिन्यात सुरूवात होईल. त्यानंतर पुढील १८ ते २४ महिन्यात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्टे आहे, असे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या मुख्य अभियंता यांनी सांगितले.