नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाची १४ ऑक्टोबरची सुट्टी रद्द करण्यात आली. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत. ही सुट्टी पूर्ववत करण्याची मागणी विविध संघटनांकडून केली जात आहे. विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी १० फेब्रुवारी रोजी काढलेल्या आदेशानुसार १४ ऑक्टोबरची सुट्टी रद्द करण्यात आली. मागील अनेक वर्षापासून सुरू असलेली धम्मचक्र प्रवर्तन दिनाची सुट्टी यावर्षी रद्द करण्यात आली आहे. ती पूर्ववत सुरू ठेवावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्थानिक प्रशासनाला विभागीय स्तरावर विविध जिल्ह्यातील विविध सणांच्या व विशेष दिनांच्या निमित्ताने सुट्ट्या देण्याचे अधिकार आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोंबर रोजी नागपुरात लाखों अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिल्याने त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे महत्त्व आले आहे. त्यामुळे या दिवशी नागपुरात मानवतावादी, बौद्ध व आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन १४ आक्टोंबर ची सुट्टी दिल्या जात होती.
प्रशासनाने हेतू पुरस्कर ही सुट्टी रद्द करून ३० एप्रिलला अक्षय तृतीया, १ सप्टेंबर ला महालक्ष्मी पूजन व २० ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आदि हिंदू धर्मातील सणांच्या सुट्ट्यांचा समावेश केला. नागपूर विभागीय आयुक्तांनी काढलेल्या आदेशामुळे नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आदी जिल्ह्यातील अनुयायांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन व विभागीय आयुक्त यांनी मानवतावादी अनुयायांच्या मागणीची दखल घेऊन विना विलंब सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. विभागीय आयुक्तांच्या वतीने सामान्य प्रशासनाचे अप्पर आयुक्त प्रदीप कुलकर्णी यांना निवेदन स्वीकारले.