लोकसत्ता टीम

वर्धा : कृत्रिम बुद्धीमत्ता अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा आता परवलीचा शब्द ठरला आहे आणि यापुढील जग हे याच आधारे चालणार असल्याचे खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात व विदेशातील कार्यक्रमात स्पष्ट करून टाकले आहे. म्हणून या विद्येची शिकवण क्रमप्राप्त ठरते. त्यासाठी अभ्यासक्रम पण तयार झालेत. पण अभिनव असा पुढाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी म्हणून ओळख निर्माण झालेल्या संस्थेने घेतला आहे.

राज्यातील अनुसूचित जातींच्या मुला मुलींसाठी ही सोय आहे. हा अडीच महिन्यांचा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स प्रमाणपत्र कोर्स राहील. हा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना ए आय कोर्सचे प्रमाणपत्र व चार हजार रुपये स्टायपेंड पण दिल्या जाणार आहे. हा कोर्स म्हणजे एक पर्वणी ठरणार. अत्याधुनिक तंत्रज्ञान परिचित होईल. रोजगाराच्या सार्वत्रिक व भरपूर संधी उपलब्ध होतील. विद्यार्थी नव्या कौशल्याने कुशल होतील. हा कोर्स छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, अमरावती, परभणी, पूणे, सोलापूर, लातूर, रायगड, नाशिक, कोल्हापूर, धुळे, सांगली व अन्य शहरात राबविण्यात येत आहे. बार्टीचा हा उपक्रम युवकांना आपले भविष्य घडविण्याची नावीन्यपूर्ण संधी उपलब्ध करून देत असल्याचे सांगण्यात आले आहे.

या कोर्ससाठी एका बॅचला अडीचशे विद्यार्थी घेतल्या जातील. त्यासाठी वयोमर्यादा घालून देण्यात आली आहे. १८ ते ३५ या वयोगटातील अनुसूचित जातीचे सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी पात्र ठरतील. ही निवड केवळ गुणवत्ते आधारे होणार. निवड करण्यासाठी परीक्षा होईल किंवा मुलाखत घेत विद्यार्थी निवडल्या जातील. ही प्रक्रिया झाली की पात्र विद्यार्थ्यांची यादी बार्टीच्या संकेतस्थलावर लावण्यात येणार.

सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञाचे आहे. त्यात बदल पण वेगाने होत असल्याचे पाहायला मिळते. म्हणून त्यातच रोजगाराच्या संधी पण बक्कळ. त्याचा भविष्यकालीन वेध बार्टीने घेत हा अभ्यासक्रम सूरू केल्याचे म्हटल्या जाते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर माहिती तंत्रज्ञान व संलग्न क्षेत्रात तसेच वाढत्या सॉफ्टवेअर उद्योगात याचा लाभ मिळणे शक्य होणार. आता प्रशासन पण यांस अनुकूल दिसत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रशासकीय कामकाजात एआय म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्याचा निर्णय आयुक्तानी घेतला आहे. तंत्रज्ञानयुक्त सेवा सुविधा दिल्या पाहिजे, अशी त्यामागची भूमिका सांगण्यात आली.

Story img Loader