चंद्रपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या वतीने आयोजित ६६ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाच्या दुसऱ्या दिवशी, रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाबासाहेबांचा अस्थिकलश भिक्खू संघ आणि समता सैनिक दलाच्या शौर्यशील पथ संचलनासह भव्य मिरवणुकीने दीक्षाभूमीवर दाखल झाला. यावेळी हजारो बौद्ध अनुयायांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार हो, जय भीम, बुद्ध भीमच्या जयघोषाने चंद्रपूरची दीक्षाभूमी दुमदुमली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांच्या नेतृत्वात, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण व सामूहिक बुद्ध वंदना करून भव्य मिरवणूक निघाली. डॉ. बाबासाहेब यांचा अस्थिकलश रथावर होता. ही मिरवणूक दीक्षाभूमीवर दाखल होताच पूज्य भदन्त आर्य नागार्जून सुरेई ससाई यांच्या हस्ते बुद्ध विहारात बाबासाहेबांचा अस्थिकलश जनतेच्या दर्शनार्थ ठेवण्यात आला. त्यानंतर समता सैनिक दलाच्या विद्यार्थ्यांनी भदन्त सुरेई ससाई यांना मानवंदना दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीप्रती कटिबद्ध राहण्याची शपथ देण्यात आली. त्यानंतर हेमंत शेडे व संचाच्या स्फूर्तिगीतांनी जनसमूह धम्ममय झाला. यावेळी प्रमुख अतिथी भदन्त नागसेन नागपूर, भदन्त महानागा, भदन्त धम्मबोधी नागपूर, भदन्त धम्मप्रकाश नागपूर, भदन्त धम्मविजय नागपूर, भदन्त धम्मशीला नागपूर, भदन्त अश्वजीत नागपूर, भदन्त नागाप्रकाश नागपूर, संस्थेचे उपाध्यक्ष मारोतराव खोबरागडे, उपाध्यक्ष अशोक घोटेकर, सचिव वामान मोडक, सहसचिव कुणाल घोटेकर, सदस्य ॲड. राहुल घोटेकर, प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर उपस्थित होते.
हेही वाचा >>> वाशीम: सरकारकडून शेतकऱ्यांना अद्यापही मदhttps://www.loksatta.com/nagpur/farmers-statewide-agitation-november-6-ravikant-tupkar-government-compensation-ysh-95-3197815/त नाही; रविकांत तुपकरांचा ‘या’ दिवशी राज्यव्यापी आंदोलनाचा ईशारा
रविवारी सकाळी ११ वाजता ‘भारतभूमीतील तथागत बुद्ध’, ‘सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शांतीपूर्ण क्रांती’ आणि ‘धम्मक्रांतीची प्रासंगिकता’ या विषयावर परिसंवाद झाला. दुपारी १.३० सामुहिक बुद्धवंदना आणि धम्मप्रवचन भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी दिले. सायंकाळी ५ वाजता मुख्य समारंभ झाला. समारंभाला अध्यक्ष अरुण घोटेकर, प्रमुख अतिथी भदन्त हो वण्णासामी अरूणाचल प्रदेश, विशेष अतिथी भदन्त डॉ. यू. जटिला म्यानमार (ब्रम्हदेश), वने व सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. बाळू धानोरकर, पद्मश्री सुखदेव थोरात, लक्ष्मण माने, अशोक घोटेकर, मारोतराव खोबरागडे, वामन मोडक, कुणाल घोटेकर, ॲड. राहुल घोटेकर, प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर उपस्थित होते. रात्री ९ वाजता सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे व वैशाली माडे यांच्या धम्मसंध्या गीताचा प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला.
हेही वाचा >>> साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?
विविध स्टॉलवर गर्दी
दीक्षाभूमीवर परिसरात सलग दोन दिवसांपासून पुस्तक, भोजनदान, आरोग्य विभाग तथा सामाजिक न्याय विभागाचे विविध स्टॉल लावण्यात आले होते. स्टॉलवर पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. विविध सामाजिक संघटनांनी भोजनदान केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध मूर्तीचे स्टॉलही येथे मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते. दि एज्युकेशन सोसायटीच्या वतीने न्यू इंग्लिश हायस्कूलच्या क्रीडांगणावर काँग्रेस नेते माजी खासदार नरेश पुगलिया, युवा नेते राहुल पुगलिया यांनी भोजनदान केले. यावेळी माजी नगरसेवक अशोक नागापुरे, देवेंद्र बेले, गजानन गावंडे गुरुजी, तारासिंग कलसी आदी सहभागी झाले होते.