वर्धा: प्रसार भारतीच्या केंद्रीय परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या भावगीत गायन श्रेणीत डॉ.भैरवी काळे मोहदुरे यांना ‘अ’ दर्जा बहाल करण्यात आला आहे. कोणत्याही कलावंतासाठी आकाशवाणी तर्फे ए दर्जा प्राप्त होणे सन्मानाची बाब समजले जाते. विदर्भात ए श्रेणी प्राप्त त्या एकमेव गायिका आहेत.
डॉ. भैरवी यांनी सावंगी येथील दत्ता मेघे अभिमत विद्यापीठातून डेंटल सर्जरी ही स्नातकोत्तर पदवी सुवर्णपदकासह प्राप्त केली आहे. त्या याच विद्यापीठाच्या शरद पवार दंत महाविद्यालयत वरिष्ठ अधिव्याख्याता म्हणून सेवारत आहेत. त्यांनी गायनाचे प्राथमिक धडे आपले वडील शास्त्रीय गायक विकास काळे यांच्या कडूनच घेतले.तर सुगम गायनाचे मार्गदर्शन त्यांना सुरमणी पं. प्रभाकर धाकडे यांच्याकडून मिळाले.
डॉ.भैरवी या नाट्यसंगीत, गझल गायन, भावगीत या गायन शैलीत पारंगत असून सध्या त्या प्रा.मंगल देशमुख यांच्याकडून गायनाचे अद्यावत शिक्षण घेत आहेत.त्या आपल्या यशाचे श्रेय आईवडील, गुरुजन,सहकाऱ्यांना देतात.सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.