नागपूर: विदेशातील रुग्ण भारतात उपचारासाठी यावे याकरिता प्रभावी उपाययोजना आखणार, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. करोनाचे रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांवर वेळीच उपचार व आजार नियंत्रणासाठी सर्व राज्यांना दिशानिर्देश दिल्याचेही त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेचा (एम्स) आढावा घेण्यासाठी शनिवारी नागपुरात आल्या असता पत्रकारांशी बोलत हेात्या. याप्रसंगी एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनिष श्रीगिरीवार, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपसंचालक डॉ. कांचन वानरे उपस्थित होत्या. डॉ. भारती पवार म्हणाल्या, करोनानंतर जगाच्या पाठीवरील अन्य प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत भारतातील वैद्यकीय उपचाराचा दर्जा खूप सुधारला आहे. भारतातील उपचार अन्य राष्ट्रांच्या तुलनेत परवडणारे आहेत. त्यामुळे भारत सरकार वैद्यकीय पर्यटनावर भर देत आहे. भारतात २०१४ मध्ये ३५० वैद्यकीय महाविद्यालय होते. आता ही संख्या ७०० च्या जवळपास आहे. २०१४ मध्ये भारतात एमबीबीएसच्या जागा ४० हजारच्या जवळपास होत्या. आता या जागा १ लाखाच्या जवळपास आहेत. सोबतच एम्सची संख्या आता २२ वर गेली आहे. विदेशातील रुग्णांवर भारतात अद्ययावत उपचार व्हावे व त्यांना सुलभ पद्धतीने व्हिसा मिळावा म्हणून उपाययोजना आखल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – लेकीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यास वीस वर्षांचा कारावास!

डॉक्टरांची माहिती एका क्लिकवर

भारतातील विविध रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांची माहिती संकेतस्थळावर असेल. त्यात या डॉक्टरांचा अनुभव, किती रुग्णांवर उपचार केले, किती शस्त्रक्रिया केल्या याचा उल्लेख असेल, असेही डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

हेही वाचा – घरफोडी-लुटमारीत सर्वाधिक बालगुन्हेगार; महाराष्ट्र पहिल्या तर तामिळनाडू दुसऱ्या स्थानावर

आता करोनासाठी वर्धक मात्रा नाही?

जगभरात करोनाचे ५० हजार रुग्ण आढळले. त्यापैकी भारतात साडेतीन हजार रुग्ण होते. केरळमध्ये २,८०० रुग्ण आढळले. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांतील आरोग्यमंत्री व अधिकाऱ्यांना आवश्यक दिशानिर्देश दिले. केंद्र सरकार पुन्हा नागरिकांना नि:शुल्क वर्धक मात्र देणार का, हा प्रश्न विचारला असता त्यांनी थेट उत्तर देणे टाळत करोनाची सध्याची स्थिती बघता कुणाला वर्धक मात्र देण्याची गरज नसल्याचे सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr bharti pawar came to nagpur on saturday to review the aiims find out what she said about foreign patients mnb 82 ssb