नागपूर-अमरावती मार्गावरील दाभा येथील आंतरभारती आश्रमाचे संस्थापक डॉ. भाऊसाहेब झिटे यांचे मंगळवारी १२ सप्टेंबर २०२३ रोजी हृदयविकाराने वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. भाऊंचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील पाचगाव येथे सामान्य शेतकरी कुटुंबात २० नोव्हें. १९३० रोजी झाला. वर्ध्याच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. तरुण वयातच झालेल्या क्षयरोगाच्या उपचारासाठी ते नागपूरच्या डॉ. गुमास्ताकंडे दाखल झाले.
विद्वद्रत्न डॉ.भाऊजी दप्तरी यांनी स्थापन केलेल्या नागपूरच्या होमिओपॅथिक महाविद्यालयातून डीएचबी ही पदवी १९५६ मध्ये घेतली. सन १९५९ मध्ये दाभा येथे एकेकाळी माळरान असलेल्या आजच्या आश्रमाच्या दहा एकर जागेवर आंतरभारती आश्रमाची स्थापना केली. आंतरभारती आश्रमात अनेक उपक्रम चालतात. पण मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही उपक्रमास शासनाचे एका पैशाचेही अनुदान नाही. आश्रमात आचार्य दादा धर्माधिकारी व यदुनाथ थत्तेंसारखी माणसं अखेरच्या काळात येऊन राहिली होती.
हेही वाचा >>>वर्धा : मोफत माती घेवून स्वतः तयार केलेली गणेश मूर्ती बसवा… पर्यावरणप्रेमी महिलांचा उपक्रम
१९७५ मध्ये भाऊंनी आंतरभारती होमिओपॅथीचे महाविद्यालय सुरू केले होते. येथून प्रेरणा घेऊन विदर्भातील ग्रामीण भागात आज हजारो डॉक्टर्स सेवा करीत आहेत. दाभ्याच्या या महाविद्यालयात पन्नास खाटांचे आंतररुग्णालय आहे. निसर्गोपचार केंद आहे. सर्व उपचार करून थकलेले रोगी अखेरीस दाभ्याच्या आंतरभारती आश्रमाच्या आश्रयाला येतात.