वर्धा : शासन सुशासन करीत असेल तरच नागरिकांचा शासनावरील विश्वास टिकून राहतो, असे म्हटल्या जाते. शासकीय योजनांचा लाभ मिळण्याची बाब काटकटीची ठरत असेल तर लोकं मग दूरच पळणार. तसे होवू नये म्हणून मग वेववेगळी पावले उचलली जात असतात. आपले सरकार आदर्श केंद्र हा असाच एक उपक्रम.जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी हा उपक्रम पुरुस्कृत करतांनाच त्याचे नियोजन पण आखून दिले आहे.

जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायत क्षेत्रातील गावाकऱ्यांना परिसरातच शासनाच्या सुविधा त्वरित व सुलभतेने प्राप्त झाल्या पाहिजे, ही भावना ठेवून आदर्श केंद्र उपक्रम अंमलात येत आहे. शासकीय योजणांचा लाभ तसेच विविध कागदपत्रे घेण्यासाठी तहसील तसेच अन्य शासकीय कार्यालयात वारंवार जावे लागते. काही ग्रामपंचायत्ती मोठ्या असल्याने कामे पण मोठ्या प्रमाणात असतात. शहरात त्यासाठी हेलपाटे घालतांना गावकरी मनस्ताप भोगतात. हे होवू नये म्हणून आदर्श केंद्र सूरू करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. भोयर म्हणतात. २०२४ – २५ या आर्थिक वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजनेतून २३ आदर्श केंद्र बांधल्या जातील. वर्धा तालुक्यातील पिपरी मेघे, सिंदी मेघे, नालवाडी, पवनार, सातोडा, बोरगाव, सावंगी मेघे, आंजी, सालोड, म्हसाळा, वरुड, वायगाव, उमरी व सेवाग्राम. सेलू तालुक्यातील घोराड, केळझर, हिंगणी. देवळी तालुक्यातील नाचणगाव व गुंजखेडा, आष्टी तालुक्यात तळेगाव, हिंगणघाट तालुक्यात अल्लीपूर व वडनेर, समुद्रपूर तालुक्यात गिरड या गावी आदर्श केंद्र स्थापन होत आहे.

प्रत्येक केंद्रास २० लक्ष रुपये मंजूर आहे. एकूण २३ केंद्रासाठी ४ कोटी ६० लक्ष रुपयाचा निधी मंजूर राखीव करण्यात आला आहे. पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले की मोठ्या लोकसंख्येतील गावांसाठी हे आपले सरकार आदर्श केंद्र एक आधार ठरेल. गावकरी, विद्यार्थी तसेच विविध लाभार्थी या केंद्राचा सहज लाभ घेऊ शकतील. ईथे अर्ज दाखल करण्याची पण सोय राहणार. लवकरात लवकर ही केंद्रे सूरू करण्यात येणार आहे.

वर्धा शहरांलगतची बोरगाव, पिपरी, सिंदी, नालवाडी, पवनार, सातोडा, सावंगी मेघे, आंजी, सालोड, म्हसळा, वरुड, वायगाव, उमरी व सेवाग्राम ही मोठी गावे आता शहरी वस्त्यांनी गजबजली आहेत. नागरी वसाहती झाल्याने विविध कामांचे प्रमाण लक्षनीय वाढले आहे. केंद्र त्यास सहाय्यक ठरू शकते.