देवेश गोंडाणे
नागपूर : काँग्रेसपासून दूर जात असलेल्या युवा वर्गाला पक्षासोबत जोडण्याचा प्रयत्न म्हणून मोठा गाजावाजा करत प्रदेश युवक काँग्रेसने ‘डॉ. श्रीकांत जिचकार लीडर्स अधिछात्रवृत्ती’ उपक्रम सुरू केला. याअंतर्गत वर्षभराआधी राज्यातील शेकडो उमेदवारांच्या काँग्रेसच्या मंत्र्यांसमोर मुलाखती घेऊन काहींची अंतिम निवडही करण्यात आली. मात्र, राज्यातील काँग्रेसच्या ज्या बारा मंत्र्यांच्या जोरावर हा उपक्रम हाती घेण्यात आला त्याच मंत्र्यांनी निवड झालेल्या एकाही उमेदवाराला अद्याप सेवेत घेतले नसल्याने मंत्र्यांच्या विरोधामुळेच योजना बारगळल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘श्रीकांत जिचकार लीडर्स अधिछात्रवृत्ती’ उपक्रमाची जून २०२० मध्ये घोषणा करण्यात आली होती. राज्यातील नवनवीन तरुण राजकारणात व प्रशासकीय कामात पुढे यावेत या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू करीत असल्याचे सांगण्यात आले होते. काँग्रेसच्या बारा मंत्र्यांकडे प्रती मंत्री तीन विद्यार्थी याप्रमाणे राज्यभरातून ३६ विद्यार्थी निवडून त्यांना अधिछात्रवृत्ती म्हणून मासिक २५ ते ३५ हजार रुपये दिले जाणार होते. यासाठी युवक काँग्रेसच्या आवाहनानंतर ऑनलाईन नोंदणीमध्ये राज्यभरातून २१ ते ३० वयोगटातील शेकडो युवकांनी अर्ज केले. यातील होतकरू उमेदवारांचे विविध पातळय़ांवर परीक्षण करून १२० युवक निवडण्यात आले. निवड झालेल्या युवकांची मंत्र्यांसमोर वर्षभराआधी मुलाखत घेण्यात आली. या १२० युवकांमधून ३६ जणांची निवडही करण्यात आली. युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी करोनाचा प्रादुर्भाव असल्याने हा उपक्रम थांबवण्यात आल्याचे पत्र उमेदवारांना पाठवले होते. याला आता वर्ष लोटले व करोनाचे सर्व निर्बंधही दूर झाले, तरी एकाही युवकाची सेवा मंत्र्यांनी घेतलेली नाही.
करोनामुळे हा उपक्रम रखडला होता. संबंधित मंत्री महोदयांशी यासंदर्भात माझी प्रत्यक्ष चर्चा झाली आहे. कुणाचाही याला विरोध नाही. या योजनेमध्ये आणखी सकारात्मक बदल करून लवकरच उपक्रम सुरू होईल.
– नाना पटोले, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस.