राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील आपल्याच सहकारी प्राध्यापकांची फसवणूक करून खंडणी वसूल करण्यासाठी डॉ. धर्मेश धवनकर यांनी सावकाराकडून व्याजाने पैसे काढून देण्याचे आमिष दाखवल्याची नवीन माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, एका प्राध्यापकाने धवनकर यांच्या आमिषाला बळी पडत काही पैसे व्याजाने घेतले तर उर्वरित पैसे पत्नीचे दागिने विकून दिल्याची गंभीर बाब आता चर्चेचा विषय झाली आहे.
सात उच्चपदस्थ विभागप्रमुखांकडून लैंगिक छळाच्या बनावट तक्रारीची भीती दाखवून लाखो रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप असलेल्या डॉ. धवनकर यांच्या पराक्रमाने संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राला हादरवून सोडले आहे. यासदंर्भात आता शैक्षणिक वर्तुळात उलट-सुलट चर्चाही सुरू झाल्या आहेत. हे सात प्राध्यापक धवनकर यांच्या जाळ्यात कसे सापडले, त्यांच्यावर कुठला दबाव होता, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासंदर्भात एका प्राध्यापकाने धवनकर यांनी विविध प्रकारचे आमिष दाखवून कशाप्रकारे फसवणूक केली याची आपबिती सांगितली. संबंधित प्राध्यापकांचा विभाग धवनकर यांच्या विभागाजवळ असल्याने त्यांची नियमित भेट होत असे. यातून मैत्रीचे संबंधही तयार झाले. याच मैत्रीचा फायदा घेत धवनकर यांनी भावनिक गळ घालून आर्थिक लूट केल्याचा आरोप प्राध्यापकाने केला आहे. पाच लाख रुपयांची मागणी करत धवनकर यांनी सावकाराकडून व्याजाने पैसे काढून देण्याची हमीही घेतली. मात्र, व्याजावर अधिक पैसे मिळू न शकल्याने शेवटी पत्नीचे दागिने विकून धवनकर यांना साडेपाच लाख रुपये दिले. त्यामुळे धवनकर यांनी मैत्रीचा फायदा घेत खोट्या तक्रारीच्या नावे खंडणी वसुलीचे कृत्य केल्याचा आरोप प्राध्यापकाने केला.
हेही वाचा: नागपूर: पीएचडीसाठी संशोधकांकडून पैसे उकळले!; धर्मेश धवनकरांचा नवीन घोटाळा उघड
मैत्री, विश्वासामुळे फसवणूक
सात प्राध्यापकांनी धवनकर यांच्यावर विश्वासच कसा ठेवला असा प्रश्न आता सर्वच स्तरातून उपस्थित होत असल्याने यासंदर्भात फसवणूक झालेल्या प्राध्यापकांकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता मैत्री, विश्वासाने आमची फसवणूक केल्याचे त्यांनी सांगितले. अनेक वर्षांचे संबंध असल्याने आणि धवनकर कुलगुरूंच्या नजिकचे असल्याने आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. आपल्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार होणे शक्यच नाही ही खात्री असली तरी कुणीतरी सूड भावनेने तक्रार केल्याचे धवनकर भासवत होते. शिवाय प्रसार माध्यमांमध्ये प्रकरण गेल्यास अनेक वर्षांपासून कमावलेली प्रतिष्ठा गमावण्याच्या भीतीनेच आम्ही धवनकरांच्या आमिषाला बळी पडलो, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा: नागपूर: धवनकरांच्या चौकशीनंतर आरोपपत्र!; कुलगुरूंनी खंडणी प्रकरणात मागितले स्पष्टीकरण
तत्काळ निलंबित करा
विद्यापीठातील नामवंत प्राध्यापकांची फसवणूक करण्याचा प्रकार काही समाजकंटकांकडून सुरू आहे. ते थांबायला हवे. हा प्रकार करणारे धवनकर कुठल्या विचारधारेचे आहेत हे तपासायला हवे. त्यांच्यावर याआधीही आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी झाल्या आहेत. त्यामुळे उच्चस्तरीय चौकशी समिती गठित होईपर्यंत धवनकर यांना तत्काळ निलंबित करावे, अशा मागणीचे निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेने कुलगुरूंना दिले आहे.
‘एसआयटी’ चौकशी करा
धवनकर यांचे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत किंवा विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करावी, अशी मागणी डॉ. बबनराव तायवाडे यांनी केली. भ्रष्टाचार झाला असेल तर पैसा घेणारा आणि देणाराही दोषी आहे. त्यामुळे सखाेल चौकशी होणे आवश्यक आहे. प्रशासनावर कुलगुरूंचा धाक नसल्याने असे प्रकार घडत असल्याचा आरोप आमदार अभिजित वंजारी यांनी केला. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.