खंडणी वसुलीच्या गंभीर आरोपानंतर डॉ. धर्मेश धवनकर यांनी गुरुवारी जनसंवाद विभागात रूजू होताच विद्यार्थ्यांना दोन तास प्रसार माध्यमातील ‘मूल्यां’चे शिक्षण दिल्याचे वृत्त समोर आले असून विद्यार्थ्यांसह शैक्षणिक क्षेत्रामध्ये हा हास्याचा विषय झाला आहे. सात उच्चपदस्थ विभागप्रमुखांकडून लैंगिक छाळाच्या बनावट तक्रारीची भीती दाखवून लाखो रुपयांची खंडणी वसूल केल्याच्या तक्रारीनंतरही निर्ढावलेले धवनकर गुरुवारी आपल्या जुन्यात ऐटीत विभागात वावरताना दिसल्याने तोही चर्चेचा विषय झाला आहे.
हेही वाचा >>>वर्धा: शेतकरी साहित्य संमेलनाध्यक्षपदी किशोर सानप
डॉ. धवनकर यांनी लाखो रुपयांची खंडणी वसूल केल्याच्या तक्रारीने संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र हादरवून सोडले आहे. यासंदर्भात विद्यापीठाने नैसर्गिक न्याय म्हणून निलंबित न करता धवनकर यांना स्पष्टीकरण मागितले आहे. गुरुवारी स्पष्टीकरणाची अंतिम तारीख होती. मात्र, धवनकर यांनी गुरुवारी स्पष्टीकरण सादर न केल्याची माहिती आहे. धवनकर यांच्याविरोधातील तक्रारीचा विषय समोर आला तेव्हा हे हैदराबाद येथे एका परिषदेसाठी गेले होते. त्यानंतर गुरुवारी जनसंवाद विभागात रूजू होत त्यांनी सकाळी १० ते १२ असा दोन तास वर्ग घेतला. आजच्या वर्गाचा विषय प्रसार माध्यमातील मूल्ये हा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. खंडणीचा इतका गंभीर आरोप झालेल्या धवनकरांनी रूजू होताच मूल्यांचे शिक्षण दिल्याने चर्चेचा विषय झाला आहे.
हेही वाचा >>>सावरकरांबद्दल काँग्रेस, शिवसेनेची मते वेगळी, पण महाविकास आघाडीला धोका नाही : जयराम रमेश
असे आहे विद्यार्थ्यांचे मत
डॉ. धवनकर हे आमचे गुरू आहेत. आम्ही त्यांचा गुरू म्हणून आदर करायचो. मात्र प्रसार माध्यमातून त्यांचे पराक्रम वाचून धक्का बसला आहे. या प्रकरणातील सत्य हे चौकशी नंतर समोर येईल. परंतु, इतके गंभीर आरोप असल्याने यात काही प्रमाणात तरी सत्यता असेल असेही काहींचे मत होते. तर कायद्यानुसार आरोप सिद्ध होईपर्यंत कुणीही गुन्हेगार नसतो. प्रसार माध्यमे त्यांच्याविरोधात अधिकची बदनामी करत असल्याचे मत एका विद्यार्थ्याने व्यक्त केले.
हेही वाचा >>>नागपूर: राहुल गांधींच्या जाहीर सभेसाठी आलेल्या वाहनांमुळे शेगावजवळ वाहतूक कोंडी
विद्यापीठाला उत्तर पाठवणार – डॉ. धवनकर
या संपूर्ण प्रकरणावर डॉ. धवनकर यांची जनसंवाद विभागात भेट घेऊन त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. ज्यांना मदत केली त्यांनीच मला धोका दिला असे ते म्हणाले. मात्र, सध्या यावर काहीही भाष्य करणाार नसून विद्यापीठाला आपले उत्तर सादर करेल असे ते म्हणाले. परंतु, त्यांच्यावरील आरोप खोटे आहेत की खरे यावरही त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला.