चंद्रपूर: समाजसेवक डॉ. गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान व सेवार्थ ग्रुपच्यावतीने सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना व नव्या पिढीतील आश्वासक सामाजिक योगदानासाठी दिला जाणारा सेवार्थ सन्मान चंद्रपूर येथील देशपातळीवर कार्यरत ‘डोनेटकार्ट’चे संस्थापक सारंग बोबडे यांना जाहीर करण्यात आला आहे.
बिबी येथील समाजसेवक डॉ. गिरीधर काळे हे मानवी शरीरातील तुटलेल्या, लचकलेल्या अस्थिरुग्णांवर मागील ३८ वर्षांपासून निःशुल्क उपचार करीत असून पाच लाखांहून अधिक अस्थिरुग्णांना त्यांनी बरे केले केले. त्यांच्या सेवेच्या सन्मानार्थ २०१२ पासून दरवर्षी स्व. सदाशिवराव चटप स्मृतिप्रीत्यर्थ माजी आमदार, शेतकरी नेते ॲड. वामनराव चटप व प्राचार्य डॉ. अनिल मुसळे यांच्याकडून पुरस्कार प्रदान करण्यात येते. रोख दहा हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व ग्रामगिता असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
हेही वाचा… सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमीच; पश्चिम विदर्भाच्या बाजारातील चित्र
मेधा पाटकर या सामाजिक कार्यकर्त्या व नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या म्हणून देश-विदेशात परिचित आहेत. सारंग बोबडे यांनी फ्लिपकार्टच्या धर्तीवर ‘डोनेटकार्ट’ कंपनी सुरू करून देशात सामाजिक कार्य व पीडितांच्या सक्षमीकरणासाठी २५० कोटींहून अधिक रक्कम थेट मदत केली आहे. ‘फोर्ब्स’ यादीत त्यांची प्रभावशील तरुण म्हणून दखल घेण्यात आली आहे. यंदाचा दिव्यग्राम महोत्सव १४ नोव्हेंबरला बिबी येथे आयोजित करण्यात आला आहे.