अकोला : आरोग्य विभागात बायोमेट्रिक हजेरीची सक्ती करण्यात आली आहे. आरोग्य सेवा आयुक्तांनी वारंवार सूचना दिल्यावरही त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे आता कठोर पावले उचलण्यात आले असून १ एप्रिलपासून बायोमेट्रिक किंवा फेस रिडिंग हजेरीनुसारच वेतन अदा केले जाणार असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी यांनी स्पष्ट केले. जि. प. आरोग्य कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरीला तीव्र विरोध केला. महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनांनी यातून वगळण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांच्याकडे निवेदन सादर केले.

सर्व आरोग्य संस्थामध्ये बायोमेट्रिक प्रणालीवर हजेरी नोंदवणे अनिवार्य असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली नसल्याचे समोर आले. सर्व नियमित, कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक प्रणालीवर ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना नव्या दिल्या आहेत. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना दररोज बायोमेट्रिक प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदवावी लागेल. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी न झाल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्यात येईल, असे स्पष्ट आदेश आरोग्य विभागाचे आयुक्त आणि राष्ट्रीय ग्रामीण अभियानचे संचालकांनी दिले आहेत.

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रावर कार्यरत आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक, सहायिका यांना नवीन प्रणालीमुळे अडचणीचा सामना करावा लागणार आहे. ग्रामीण भागात जाऊन आरोग्य सेवा देतांना बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करणे फार अडचणीचे ठरेल. परिणामी, आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बायोमेट्रिक प्रणालीतून ग्रामीण भागात फिरस्तीचे काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रणालीतून वगळावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना राज्य अध्यक्ष अशोक जयसिंगपूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष संगीता जाधव, आम्रपाली जाधव, लक्ष्मी सोळंके, सुरेखा गीते, डि.के. खंडारे, प्रवीण लोखंडे, आर.आर. गावंडे आदींनी केली आहे.

….तर दिलेल्या वेतनाची वसुली

०१ एप्रिलपासून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बायोमेट्रिक किंवा फेस रिडिंग हजेरीनुसारच वेतन अदा करण्याच्या सूचना आहेत. त्या व्यतिरिक्त वेतन अदा केल्यास संबंधित लेखा अधिकारी तसेच आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना जबाबदार धरत त्यांच्याकडून वेतनाची रक्कम वसूल करण्यात येईल, असा इशारा आरोग्य सेवा उपसंचालकांनी संबंधितांना दिल्या आहेत.