नागपुरात सरसंघचालकांसोबत शर्माना व्यासपीठावर स्थान नाही
अलीकडच्या काही दिवसांमध्ये वाचाळ म्हणून उल्लेख होत असलेले केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांना शनिवारी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत व्यासपीठावर बसू देण्यात आले नाही. हे जाणीवपूर्वक घडले की, नजरचुकीने, याविषयी आज संघ व भाजपच्या वर्तुळात चर्चा सुरू होती.
आर.एस. मुंडले धरमपेठ कला-वाणिज्य महाविद्यालय आणि आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक अभ्यास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ‘प्राचीन भारतीय संस्कृतीचे जगातील प्रतिध्वनी’ या विषयावर महाविद्यालयाच्या प्रांगणातच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच्या उद्घाटनाला सरसंघचालक मोहन भागवत व डॉ. महेश शर्मा उपस्थित राहणार असल्याचे महाविद्यालयाने जाहीर केले होते. केंद्रीय मंत्र्यांनाच आमंत्रित केल्याने साहजिकच ते व्यासपीठावर असतील, असे गृहितच होते. मात्र, वेळेवर हजर राहूनसुद्धा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या डॉ.महेश शर्मा यांना आयोजकांनी व्यासपीठावर नेलेच नाही. अलीकडेच त्यांनी साहित्यिक, महिला आणि अल्पसंख्यकांविरोधात जी गरळ ओकली ती पचनी न पडल्यानेच त्यांना खाली बसण्याची शिक्षा मिळाली असावी, अशी चर्चा या कार्यक्रमात सुरू झाली. डॉ. शर्मा यांनी भागवतांचे भाषण खाली बसूनच ऐकले. उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यावर भागवत निघून गेले आणि मग शर्मा व्यासपीठावर आले. शर्माची वादग्रस्त वक्तव्ये पाहू जाता संघानेच त्यांना दूर ठेवले असावे, अशी चर्चा मग सुरू झाली. या कार्यक्रमाचे आयोजन करणारी शिक्षण संस्था संघ वर्तुळाशीच संबंधित आहे.
यासंदर्भात महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या नायर म्हणाल्या, डॉ.महेश शर्मा यांचे बीजभाषण सकाळी ११ वाजता होते आणि त्यांना त्यासाठीच आमंत्रित करण्यात आले होते. त्यापूर्वी ९.३० वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम होता. त्यांना सरसंघचालकांचे भाषण ऐकायचे असल्याने ते प्रेक्षकांमध्ये बसले. शिवाय, ते उशिराही आलेले होते. मात्र, उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांचेही नाव आहे, हे निदर्शनास आणून दिल्यावर नायर काहीही बोलल्या नाहीत. कार्यक्रम संपल्यावर काहींनी आयोजकांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली तेव्हा तेही समर्पक उत्तरे देऊ शकले नसल्याचे एका ज्येष्ठ स्वयंसेवकाने सांगितले. कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर असलेले संस्थेचे अध्यक्ष रवींद्र जोशी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून, तसेच लघुसंदेश पाठवून त्यांनीही प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. महिलांनी रात्री बाहेर जाणे हे भारतीय संस्कृतीविरोधात आहे, दादरी येथील घटना अपघात आहे, साहित्यिकांनी आधी लिहिणे सोडावे मग काय करायचे ते बघू, अशा त्यांच्या वक्तव्यांनी देशभर रान उठले होते.