गडचिरोली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक म्हणून ओळख असलेला भाजपचा तरुण चेहरा डॉ.मिलिंद नरोटे यांच्या विजयाने गडचिरोली भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या विजयाने लोकसभेत मिळालेल्या अपयशामुळे निर्माण झालेली मरगळ दूर झाल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे. केवळ भाजपच नवे तर विधानसभेतील तरुणांमध्ये देखील उच्चशिक्षित, तरुण आमदारबद्दल कुतूहल दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभेत काँग्रेसला मोठी आघाडी होती. त्या भरवशावर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना ही जागा जिंकण्याचा विश्वास होता. मात्र, निकालानंतर त्यांचा हिरमोड झाला आहे. याठिकाणी भाजपचे डॉ.मिलिंद नरोटे यांनी बाजी मारली. लोकसभेतील निकालानंतर भाजप आणि संघाने आखलेल्या रणनीतीला याचे श्रेय जाते.
आणखी वाचा-दोन खासदारांच्या अंगणात महायुतीचा सुरुंग…
पराभवानंतर भाजपने गडचिरोलीचे विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांना उमेदवारी नाकारून हे दाखवून दिले. पक्षविरोधी कारवाया आणि विरोधात असलेले वातावरण यासाठी कारणीभूत ठरले. त्यानंतर याठिकाणी जुन्या नेत्याला संधी न देता डॉ. मिलिंद नरोटे या तरुण चेहऱ्याला मैदानात उतरवले. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. नरोटे यांनी मागील काही वर्षांपासून स्पंदन फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य आणि यामाध्यमातून त्यांच्यासोबत जुळलेल्या युवकांच्या फळीने निवडणुकीत केलेली मेहनत, यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाला.
संपूर्ण निवडणुकीदरम्यान संघांचे सूक्ष्म नियोजन आणि त्याची जमिनीवर तंतोतंत अंमलबजावणी करणारे कार्यकर्ते, ही जमेची बाजू होती. विदर्भातील दोन जागेसाठी संघ आग्रही होता. त्यात गडचिरोलीचा समावेश आहे. लोकसभेतही संघाकडून डॉ. मिलिंद नरोटे यांचे नाव पुढे करण्यात आले होते. मात्र, विद्यमान खासदारांना संधी देण्यात आली आणि ते पडले. त्यामुळे विधानसभेत नरोटे यांचे नाव आधीच ठरले होते. नरोटे यांच्या विजयाने गडचिरोली भाजपमध्ये आता ‘युवापर्व’ सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
आणखी वाचा-पश्चिम विदर्भात महाविकास आघाडीला ‘वंचित’चा नऊ जागी अपशकून…
पक्षांतर्गतविरोध संयमी पद्धतीने हाताळला
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना त्यांच्या शांत स्वभावामुळे संयमी नेता म्हणून ओळखल्या जातात. निवडणुकीदरम्यान त्यांना केवळ विरोधी पक्षाचाच नव्हे तर पक्षांतर्गत विरोधकांचा देखील सामना करावा लागला. मात्र, हा विरोधात देखील त्यांनी संयमी पद्धतीने हाताळल्याने शेवटी सगळेच विरोधक गार झाले. बऱ्याच वर्षानंतर गडचिरोली जिल्ह्याला एक तरुण आणि उच्च शिक्षित आमदार मिळाल्याने नागरिकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.