नागपूर : ‘‘भारताला सामाजिक विषमतेचा मोठा इतिहास आहे. आमच्याच बांधवांना आम्ही जातींवरून पशुसारखी वागणूक दिली. दोन हजार वर्षे अनेक लोक गुलामीचे जीवन जगले. महाभारतातही जातीपातीची उदाहरणे दिसतात. त्यामुळे ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना समान पातळीवर आणेपर्यंत आणि भेदभाव संपेपर्यंत आरक्षण सुरूच राहायला हवे. संविधानाने दिलेले आरक्षण संघालाही मान्य आहे’’, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी केले.
नागपुरातील श्री अग्रसेन छात्रावासात सरसंघचालकांनी बुधवारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. ते म्हणाले, ‘‘आरक्षण हा विषय आर्थिक समानता आणण्यापुरता मर्यादित नाही.सामाजिक समानता आणणे आवश्यक आहे. आजही समाजामध्ये अनेकदा जातीय भेदभावाच्या घटना घडतात. काहींना मंदिरात प्रवेश नाकारल्याचे आपण बघतो. त्यामुळे अशा समाजाला समान पातळीवर आणण्यासाठी आताच्या पिढीलाही योगदान देण्याची गरज आहे’’.
हेही वाचा >>>खळबळजनक! अवैध दारू तस्करीप्रकरणी काँग्रेस नेत्याच्या दोन मुलांसह पाच जणांवर गुन्हे; आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
‘‘आज जे लोक केंद्र सरकारच्या सेवेत मोठय़ा पदावर काम करत असले की, आपण त्यांची प्रतिष्ठा वाढली असे म्हणतो. मात्र, तिथेही आपल्याला छुपा जातीयवाद पाहायला मिळतो. आरक्षणाचा विषय तर्काच्या आधारावर आपण कधीच समजू शकणार नाही. हा तर्काचा विषय नसून, समानता मानण्याचा विषय आहे. आरक्षणाचा लाभ घेतलेल्यांच्या गरजा पूर्ण झाल्याने त्यांनी आरक्षण सोडून देण्याबाबतही आवाज उठतो. मात्र, सामाजिक समानता आल्याशिवाय काहीही शक्य नाही. त्यामुळे आरक्षण कधीपर्यंत राहील, असा प्रश्न ज्यांच्या मनात निर्माण होतो त्यांनी हा विचार करावा की, काही लोकांनी दोन हजार वर्षे अन्याय, त्रास सहन केला, मग आम्ही दोनशे वर्षे कष्ट भोगले तर काय बिघडणार आहे?’’, असे भागवत म्हणाले.
‘‘आर्थिक हित असेपर्यंत युरोपीय राष्ट्र एकत्र आहेत. त्यांचा राष्ट्रवाद हा आर्थिक संबंधांवर आधारित आहे. मात्र, आम्ही राष्ट्रीयता जपणारे आहोत. हिंदूत्व म्हणजेच राष्ट्रीयता’’, याकडेही भागवत यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा >>>चंद्रपूर जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांचा राजीनामा; नेमके कारण काय, जाणून घ्या…
‘तिरंग्याच्या सन्मानासाठी प्रत्येक स्वयंसेवक पुढे’
संघाच्या कार्यालयात १९५० ते २००२ पर्यंत तिरंगा का फडकवला गेला नाही, असा प्रश्न एका विद्यार्थ्यांने भागवत यांना केला. त्यावर भागवत म्हणाले, ‘‘संघाच्या दोन्ही कार्यालयांत तिरंगा फडकवला जातो. तसेच १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला आम्ही कुठेही असलो तरी तिथे तिरंगा फडकवतो. आम्ही तिरंगा फडकवतो की नाही हा प्रश्नच विचारायला नको. काँग्रेसचा झेंडा आणि तिरंगा ध्वजाचे रंग सारखे आहेत. १९३३च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये त्यांचा झेंडा फडकत नव्हता तेव्हा एक तरुण समोर आला आणि रुळावर चढून त्याने दोरीने ओढत तो फडकवला. त्यावर पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याची पाठ थोपटून पुढच्या अधिवेशनात सत्कार करण्याचे जाहीर केले. मात्र, तो संघाच्या शाखेत जातो हे कळल्यावर त्यांनी ते केले नाही. शेवटी डॉ. हेडगेवार त्याला भेटले व तांब्याचा शिक्का देऊन त्याचा सन्मान केला. त्यामुळे तिरंग्याच्या सन्मानाचा प्रश्न जेव्हाही येतो तेव्हा संघाचा प्रत्येक स्वयंसेवक पुढे असतो.’’
‘अखंड भारत नक्की होईल’
तरुणांनी ठरवले तर त्यांच्या म्हातारपणाआधीच अखंड भारत होईल, असा आशावाद भागवत यांनी व्यक्त केला. ‘‘अखंड भारत म्हणजे केवळ नकाशावरच्या रेषा पुसणे नाही. त्यासाठी आमच्या नजीकच्या देशांमध्ये भारतीयत्व रुजवणे आवश्यक आहे. भारतापासून वेगळे झालेले अनेक देश आज चूक केली, हे मान्य करतात. आम्ही एकाच भारतभूमीचे अंग आहोत. अखंड भारतात यायचे असेल तर त्यांना स्वार्थ, कट्टरता आणि फुटीरवाद सोडावा लागेल’’, असेही डॉ. भागवत म्हणाले.