अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यशस्वी व प्रगतशील शेतकरी व कृषी पदवीधरांचे कार्य इतर शेतकऱ्यांपुढे मांडण्यासाठी ‘कृषी पदवीधर आयडॉल’ उपक्रम सुरू केला. या उपक्रमामध्ये विदर्भातील विद्यापीठांच्या प्रक्षेत्रावर फलकांवर यशस्वी कार्य झळकले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. विदर्भातील इतर शेतकऱ्यांसाठी यशस्वी शेतकरी व कृषी पदवीधर प्रेरणादायी ठरत आहेत.
‘विकेल तेच पिकवणे’ ही काळाची गरज झाली. प्रगत शेती तंत्रज्ञानाच्या सहकार्याने अपारंपरिक स्त्रोतांचा प्रभावी वापर करीत फायद्याच्या शेतीकडे बहुतांश शेतकऱ्यांचा कल आहे. व्यावसायिक शेती साकारणाऱ्या व इतरांना मार्गदर्शक ठरलेल्या विदर्भातील शेतकरी व कृषी पदवीधरांच्या कार्याचा परिचय इतरांना होण्याच्या दृष्टीने कृषी विद्यापीठाने विशेष उपक्रम सुरू केला. माजी कुलगुरू डॉ.विलास भाले यांनी विद्यापीठात फलकांद्वारे यशस्वी शेतकऱ्यांचे प्रयोग इतरांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली. त्या उपक्रमाला विद्यमान कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यापक स्वरूप दिले. त्यांच्या संकल्पनेतून ‘शेतकरी आयडॉल’चे फलक विदर्भातील गडचिरोलीपासून बुलढाणा जिल्हापर्यंत विद्यापीठाच्या प्रक्षेत्रांवर जानेवारी महिन्यापासून झळकत आहेत.
हेही वाचा… वारली चित्रकलेचा अद्भुत शालेय आविष्कार, पंतप्रधानांच्या हस्ते होणार प्रकाशन
प्रयोगशील शेतकऱ्यांनी कृषीचा अभ्यासक्रम पूर्ण करून व्यावसायिक शेती करण्यावर भर दिला. कृषी उद्योजक, निर्माते, मार्गदर्शक होत परिपूर्ण व्यावसायिक शेती साकारली. ते इतरांसाठी दिशादर्शक ठरतात. त्याच प्रमाणे अनेक यशस्वी कृषी पदवीधर देखील आहेत. त्यांनी यशस्वी कृषी उद्योग उभारले आहेत. त्या सर्वांचा कार्य परिचय देखील उपक्रमाच्या माध्यमातून करून दिला जात आहे. त्यांच्या कार्यातून कृषीसह इतरही अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या युवा पिढीला प्रेरणा मिळत आहे. प्रत्येकी दोन महिन्यासाठी एक प्रगतशील शेतकरी व एक यशस्वी कृषी पदवीधर कृषी विद्यापीठाच्या विदर्भातील प्रक्षेत्रावर झळकतो. कृषी विज्ञान केंद्र व इतर संस्थांच्या माध्यमातून त्यांची निवड केली जाते.
हेही वाचा… चंद्रपूर : शेतमजुराची मुलगी बनली फौजदार, तनुजा खोब्रागडे हिचे एमपीएससी परिक्षेत सुयश
जानेवारी महिन्यात उपक्रमाला सुरुवात झाली. पहिला दोन महिन्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी संतोष बिसेन व उद्योजक गणेश देशमुख, मार्च व एप्रिल महिन्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील यशस्वी शेतकरी मोहन जगताप व यवतमाळ जिल्ह्यातील कृषी उद्योजिका संगीता सव्वालाखे, मे आणि जून महिन्यात अमरावती जिल्ह्यातील प्रयोगशील महिला शेतकरी हर्षना वाहणे, वर्धा जिल्ह्यातील कृषी उद्योजक धनंजय पहाडे हे आतापर्यंत कृषी विद्यापीठाचे ‘आयडॉल’ ठरले आहेत. जुलै व ऑगस्ट महिन्यात यवतमाळ जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आनंद गोविंदवार व कृषी पदवीधर गजानन जाधव यांच्या कार्याची माहिती संपूर्ण विदर्भ कृषी विद्यापीठाद्वारे फलकांवर लावण्यात आली आहे. प्रयोगशील शेतकरी व यशस्वी कृषी पदवीधरांचे कार्य लक्षवेधी ठरत आहे.
प्रयोगशील शेतकरी व यशस्वी कृषी पदवीधरांच्या कार्य परिचयातून इतरही शेतकरी, युवा कृषी पदवीधरांना प्रेरणा मिळावी, यासाठी कृषी विद्यापीठाने हा उपक्रम सुरू केला आहे. युवा पिढीने शेतीकडे वेळावे व यातूनच शाश्वत ग्रामविकास साध्य व्हावा, ही विद्यापीठाची भावना आहे. – डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.