अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या दीक्षांत समारंभामध्ये शिष्टाचाराला फाटा देऊन नवा पायंडा पाडल्याचे दिसून आले. राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत कार्यक्रम कमी वेळात आटोपण्याच्या गडबडीत आचार्य पदवी व पारितोषिकांचे चक्क सामूहिकरित्या वितरण केल्याचा प्रकार बुधवारी घडला. त्यामुळे पदवीधरांचा प्रचंड हिरमोड झाला असून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरवर्षी नियोजनबद्ध होणाऱ्या दीक्षांत समारंभाचे यावर्षी नियोजन कोलमडल्याचे चित्र होते.

दीक्षांत समारंभ हा गुणवंतांचा सन्मान करण्याचा दिवस. पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभिमान बाळगण्याचा जीवनातील अविस्मरणीय क्षण समारंभाचा असतो. वर्षानुवर्षे अभ्यास करून यश मिळवल्यानंतर दीक्षांत समारंभात आपले कौतुक होणार, अशी आस गुणवंत विद्यार्थ्यांना लागली असते. त्याच प्रमाणे अनेक वर्ष संशोधन करून आचार्य पदवी प्राप्त करणाऱ्यांसाठी देखील मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र घेण्यात मोठा सन्मान असतो.

विद्यार्थी वर्षभर या सन्मानाच्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, डॉ.पं.दे.कृ.वि.च्या ३९ व्या दीक्षांत समारंभात पदवीधरांच्या सन्मानावरच पाणी फेरल्या गेले. डॉ.पं.दे.कृ.वि.च्या आतापर्यंत झालेल्या ३८ दीक्षांत समारंभांमध्ये आचार्य पदवी व पारितोषिके गुणवंतांना व्यासपीठावर बोलावून सन्मानाने मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्याची परंपरा होती. दीक्षांत समारंभाचा तसा शिष्टाचारच राहिला आहे. मात्र, ३९ व्या दीक्षांत समारंभात त्या परंपरेला मूठमाती देऊन केवळ काही मिनिटांचा वेळ वाचवण्यासाठी पदवीधरांना आचार्य पदवी व पारितोषिकांचे सामूहिक वितरण केले. त्यामध्ये ८२ पारितोषिकांचे पदवी, पदव्युत्तर, उत्कृष्ट शिक्षक, संशोधक, उत्कृष्ट कर्मचारी अशा ४९ जणांना सामूहिक वितरण करीत छायाचित्रण करण्यात आले. आचार्य झालेल्या २५ जणांना देखील सामूहिकरित्याच पदवी प्रदान केल्या गेली.

राज्यपाल कार्यालयाकडून दीक्षांत समारंभासाठी अवघ्या एका तासाचा कालावधी दिला होता. त्या अल्प कालावधीत संपूर्ण दीक्षांत समारंभ आटोपण्यासाठी पदवीधरांच्या सन्मानावरच घाला घालण्यात आला. या प्रकारामुळे पदवीधर, संशोधक, शिक्षक नाराज झाले. त्यांनी तीव्र नाराजीची भावना व्यक्त केली.

राज्यपाल कार्यालयाचा हस्तक्षेप

‘डॉ.पं.दे.कृ.वि.’च्या ३९ व्या दीक्षांत समारंभाच्या नियोजनामध्ये राज्यपाल कार्यालयाने हस्तक्षेप करून बदल केल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली. त्यामुळे दीक्षांत समारंभाचे नियोजन कोलमडल्याची चर्चा आहे.

मराठीचे वावडे; इंग्रजी भाषेतून समारंभ

‘डॉ.पं.दे.कृ.वि.’चा आतापर्यंतचे दीक्षांत समारंभ मराठी भाषेतूनच झाले. यावर्षी प्रथमच मराठी भाषेकडे दुर्लक्ष करून इंग्रजी भाषेतून संपूर्ण दीक्षांत समारंभ घेण्यात आला. राज्यपाल, प्रमुख अतिथींचे दीक्षांत भाषण, कुलगुरूंचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आदी सर्व इंग्रजीतून झाले. केवळ कृषिमंत्र्यांनी मराठीतून भाषण दिले. शासकीय कार्यालय आणि कार्यक्रमात मराठी भाषा अनिवार्य असतांना दीक्षांत समारंभात मात्र त्याचे वावडे दिसून आले.

Story img Loader