अकोला: पश्चिम विदर्भात पाच जिल्ह्यांसाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ कार्यरत आहे. त्याचे विभाजन करून अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यांसाठी नवे विद्यापीठ किंवा उपकेंद्र करण्याची मागणी होत आहे. मात्र, नवीन विद्यापीठ व्यावहारिक दृष्या अयोग्य असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञ तथा विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. संजय खडक्कार यांनी व्यक्त केले. रिक्त पदे व अपुऱ्या निधीमुळे अमरावती विद्यापीठाचेच कार्य प्रभावित झाले असून त्याच्या सक्षमीकरणाची मागणी त्यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विदर्भातील नागपूर विद्यापीठाचे विभाजन होऊन अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा व यवतमाळ या जिल्ह्यांसाठी १ मे १९८३ रोजी अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठावर पाच जिल्ह्यांचा भार आहे. त्यामुळे अकोला, वाशिम बुलढाणा या जिल्ह्यांसाठी उपकेंद्र किंवा नवीन विद्यापीठाची स्थापना करण्याची मागणी सातत्याने केली जाते. प्रामुख्याने राजकीय नेत्यांकडून ही मागणी वारंवार होतांना दिसते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना होऊन ४० वर्षांचा कालावधी लोटला. विद्यापीठात अद्यापही बरेच शैक्षणिक विभाग हे एका प्राध्यापकाच्या भरोशावर किंवा घड्याळी तासिकेवर काम करणाऱ्या शिक्षकांवर चालू आहेत.

हेही वाचा… कोकणसह विदर्भातील काही जिल्ह्यांना आज ‘ऑरेंज अलर्ट’

नियमित प्राध्यापकांची असंख्य पदे रिक्त आहेत. गेल्या काही वर्षांपासून शासनाने विद्यापीठाला नवीन विषय हे विनाअनुदानित तत्त्वावर मंजूर केले आहेत. उच्च शिक्षणासाठी पुरेशा निधीच्याअभावी विद्यापीठात थांबलेली पदभरती व उच्च दर्जाच्या साधन सुविधांच्या कमतरतेमुळे विद्यापीठाला नॅकद्वारे ‘अ’ श्रेणी सुद्धा प्राप्त झाली नाही. अशीच परिस्थिती सन २०११ मध्ये स्थापन झालेल्या गोंडवाना विद्यापीठाची देखील आहे.

हेही वाचा… नागपूर: इन्स्टाग्रामवरील मित्राकडून तरुणीचा विनयभंग

अस्तित्वातील विद्यापीठांसाठी निधी उपलब्ध होत नसताना अकोला, वाशिम व बुलढाणासाठी नवीन विद्यापीठ स्थापन करणे व्यावहारिक दृष्ट्या कितपत योग्य ठरेल? असा सवाल डॉ. संजय खडक्कार यांनी केला आहे.

तंत्रज्ञानाचा वापर करण्यात विद्यापीठ मागेच

माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यापीठातील सर्व घटकांच्या सेवा-सुविधा या सहजतेने कितीही अंतरावर पोहोचवल्या जाऊ शकतात. तंत्रज्ञानाच्या वापरातून कमी खर्चात विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या विविध सुविधांचा लाभ होऊ शकतो. विद्यापीठ महाविद्यालय व विद्यार्थ्यांना सहज सेवा उपलब्ध करून देऊ शकते. विद्यापीठाचा स्वत:चा संगणक विभाग आहे. मात्र, विद्यापीठ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात मागे असल्याने त्याचा त्रास महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो, अशी टीका डॉ. खडक्कार यांनी केली.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत येणाऱ्या तीन जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ किंवा उपकेंद्र करण्याची काही गरज नाही. उपकेंद्र किंवा नवीन विद्यापीठ स्थापनेचा अवाढव्य खर्च करण्याऐवजी विद्यापीठाला निधी उपलब्ध करून त्याचे सक्षमीकरण करणे अधिक योग्य ठरेल. विद्यापीठाने महाविद्यालय व विद्यार्थ्यांना सर्व सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही. – डॉ.संजय खडक्कार, माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr sanjay khadkkar expressed that due to vacancies and insufficient funds the work of amravati university itself has been affected ppd 88 dvr