नागपूर: इंटरनॅशनल डायबेटिज फेडरेशन, साऊथ इस्ट एशियाचे माजी अध्यक्ष व पद्मश्री डॉ. शशांक जोशी हे मद्रासच्या आयआयटी आणि कॅलिफोर्नियाच्या ट्विन हेल्थ कंपनीसोबत एका मोबाईल ॲपवर काम करत आहेत. या ॲपच्या मदतीने व्यक्तीच्या आहाराची निवड आणि जीवनशैलीचा मागोवा घेता येणे शक्य होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास ७५ टक्के मधूमेहग्रस्तांच्या औषधी सुटू शकतात.
ऑल इंडिया असोसिएशन फाॅर ॲडव्हान्सिंग रिसर्च इन ओबेसिटी संघटनेकडून नागपुरात लठ्ठपणावर एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी आले असता डॉ. शशांक जोशी यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला. ते म्हणाले, हे डिजिटल ट्विन ॲप १७४ हेल्थ मार्कर वापरून तयार केले जात आहे. त्यावर दररोज तीन हजाराहून जास्त डेटा पाॅईंट्स एकत्रित केले जातात.
हेही वाचा… विभागीय कार्यालयाला टाळे लागताच एसटी महामंडळ ताळ्यावर! कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उपदानासाठी…
संबंधित व्यक्तीला या ॲपमध्ये किती वेळ व्यायाम केला, कोणते पदार्थ खाल्ले ही माहिती वेळोवेळी अपलोड करावी लागते. एखाद्या वस्तूची माहिती अपलोड केली तर त्यात किती कॅलरीज व साखर आहे हे ॲप शोधते. त्यानंतर त्यापैकी किती मात्रा खावी वा त्यात काय बदल करावा हे ॲप लगेच सूचवते. बेंगळुरूमध्ये सुरू असलेली ३०० स्वयंसेवकांवरील वैद्यकीय चाचणी सलग पाच वर्षे चालणार आहे. त्यापैकी पहिल्या व दुसऱ्या वर्षीचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार टाईप २ मधूमेह असलेल्यांपैकी ७५ टक्के रुग्णांच्या औषधी बंद होऊ शकतात. परंतु त्यांनी नित्याने व्यायाम, आहारासह तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जीवनशैलीत बदल करणे गरजेचे असल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगितले.
“लठ्ठपणा दूर करण्यासाठी जीवनशैलीतील बदल, विविध औषधी, संशोधनात्मक स्थितीत असलेले ट्विन हेल्थ ॲप, बेरियाट्रिक शस्त्रक्रिया हे पर्याय आहेत. लठ्ठ व्यक्तीला मधूमेहाचाही धोका असतो. मद्रासच्या आयआयटी आणि कॅलिफोर्नियाच्या ट्विन हेल्थ कंपनीसोबत या ॲपवर काम सुरू आहे. प्राथमिक चाचणीचा अहवाल सकारात्मक आहे.” – पद्मश्री डॉ. शशांक जोशी, माजी अध्यक्ष, इंटरनॅशनल डायबेटिज फेडरेशन, साऊथ इस्ट एशिया.