बारामती: मुलांना शालेय जीवनात अभ्यास जेवढा गरजेचा आहे, तेवढीच इतर कलेची आवड असणे सुद्धा गरजेची आहे, कोणत्याही कलेमध्ये मुले पारंगत झाली तर त्याचा उपयोग भविष्यात आपला आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो,खरे तर “कले शिवाय जीवन म्हणजे मिठाशिवाय जेवण”! असेच आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ व्यंगचित्रकार डॉक्टर शिवाजी गावडे यांनी केले.
बारामती तालुक्यातील डोरलेवाडी येथिल एका इंग्रजी माध्यम विद्यालयात ” रेषांची भाषा “या विषयावर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते, याप्रसंगी डॉ. गावडे यांनी या विद्यालयातील विद्यार्थ्यांशी हास्य बोलके चित्र कले मधून संवाद साधला.यावेळी त्या विद्यालयाचे विश्वस्त सुमित्रा निंबाळकर, पृथ्वीराज नवले, आदींसह विद्यार्थी वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होता ,
यावेळी व्यंगचित्रकार शिवाजी गावडे यांनी कला म्हणजे काय ? कलेचा शोध कसा लागतो ? प्रत्येकामध्येच कला असते ? ती कला कशी जोपासावी? आणि त्या कलेचा विकास कसा करावा? आपल्या परिसरात कोणत्या वेगवेगळ्या कला आहेत, या बाबत सुद्धा विद्यार्थ्यांना श्री. गावडे यांनी सखोल मार्गदर्शन केले.
श्री.गावडे यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील कलेला प्रेरणा दिली, शिवाय विद्यार्थ्यांनी कलेविषयी विचारलेल्या विविध प्रश्नाचे निरसन त्यांनी यावेळी केले, तसेच काही कलाकारांच्या कथा सांगून विद्यार्थ्यांच्या मधील आत्मविश्वास वाढविला, विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच त्यांनी निसर्ग,प्राणी, पक्षी, नामवंत व्यक्तींची अनेक विविध चित्रे रेखाटल्याने विद्यार्थी सुद्धा पाहून भारावून गेली होती , पृथ्वीराज नवले यांनी व्यंगचित्रकार डॉ.गावडे यांचा या वेळी सत्कार करून उपस्थितांचे आभार मानले.