नागपूर : छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर महाराज आणि त्यांची पत्नी येसूबाई पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा आणि पत्नी येसूबाई यांनी त्यांना दिलेली साथ यामुळे आदर्श जोडी म्हणून त्यांना संबोधित केले जात आहे. महाराजांच्या पत्नी यांच्या जीवनावर आधारित ‘श्रीसखी राज्ञी महाराणी येसूबाई’ या पुस्तकाचे लिखाण डॉ.शुभा साठे यांनी केले. अलिकडेच नागपूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वाङमयीन जीवनावर आधारित परिसंवादात डॉ.शुभा साठे यांनी सावरकर यांच्याबाबत मोठे विधान केले. सावरकर यांचे विरोधक त्यांना डावलण्यासाठी लहानातील लहान घटना शोधून त्यांच्यावर काहीही टीका करतात, असे शुभा साठे म्हणाल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लिखाण विज्ञानवादी असे महत्वपूर्ण विधानही डॉ.साठे यांनी केले.
धर्माबाबत तार्किक प्रश्न विचारायचे
स्वातंत्र्यवीर सावरकर हे आस्तिक असले तरी विज्ञाननिष्ठ होते. सावरकर बुद्धीचा डोळा उघडा ठेवून प्रत्येक गोष्टीचा विचार करणारे होते. त्यांनी लिहिलेेले विज्ञानवादी निबंध आजच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देणारे आहेत, असे मत लेखिका डॉ. शुभा साठे यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय साहित्य परिषद विदर्भ प्रांताच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथीनिमित्त परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. धरमपेठ परिसरातील डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या सभागृहात आयोजित या परिसंवादात डॉ. शुभा साठे आणि प्रा. डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी सावरकरांच्या लिखाणाचे पैलू उलगडले. अध्यक्षस्थानी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे होते. यावेळी डॉ. साठे म्हणाल्या, ‘सावरकरांनी केवळ हिंदू धर्माच्या चालीरितीबाबत नव्हे तर इतर धर्मातील चुकीच्या चालीरितींवर देखील लिखाण केले.
सत्यनारायण पूजेचा संदर्भ देताना देव आधी संकटात टाकतो आणि मग तोच संकटातून काढतो. नवस बोलून देवावर सोडून लोक मोकळे का होतात, अशाप्रकारचे अनेक तार्किक प्रश्न सावरकरांनी उपस्थित केले. दुसरीकडे, धर्मांतर हेच राष्ट्रांतर आहे. धर्मांतर केल्यामुळे धर्मातील एक व्यक्ती कमी होत नाही तर दुसऱ्या धर्मात एक नवा शत्रू निर्माण होतो, असे सावरकर मानत होते. अलिकडे सावरकरांबाबत घटना शोधून त्यांच्या विरोधात काहीही विधान केले जाते. सावरकरांच्या विरोधकांना सावरकरांनी सांगितलेल्या विचारांना कृतीत आणून जबाब देण्याची गरज असल्याचे डॉ. साठे यांनी सांगितले. संचालन शलाका जोशी यांनी केले. साहित्य परिषद विदर्भ प्रांताचे अध्यक्ष लखनसिंह कटरे, कार्याध्यक्ष अविनाश पाठक, महामंत्री सचिन नारळे, प्रमुख मार्गदर्शक प्रकाश एदलाबादकर, महेश आंबोकर यावेळी उपस्थित होते.