नागपूर: आजही एखादा म्हणतो की, माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा? असा प्रश्न करत संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी पंतप्रधान मोदींचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली. तब्बल सात दशकांनी देशाची राजधानी दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यानंतर दुसऱ्या उद्घाटन सत्रात संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीदरम्यान एका वृत्तवाहिणीच्या मुलाखतीमध्ये मोदींनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केले होते. तुम्ही थकत का नाहीत? असा प्रश्न पत्रकाराने विचारल्यानंतर मोदी म्हणाले, “मी आता या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, माझा जन्म जैविकदृष्ट्या झालेला नाही. मला ईश्वराने त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी पाठविले आहे.” मोदींच्या या विधानावरून त्यांना बरीच टीकाही सहन करावी लागली होती.

संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या की, शिवला तर विटाळ होतो आणि दुसरा स्त्रीचा. निसर्ग धर्माने दिलेली मासिक पाळी तिची! त्यालाही विटाळच म्हणायचं. आता ही बाई कुठल्याही शाळा, कॉलेजात गेली नाही, कुठल्याही स्त्री मुक्तीवालीकडे गेली नाही, तिला कुठली ‘सिमोन दि बोव्हा’ माहिती नव्हती. ती काय म्हणते ? ‘देहाचा विटाळ, देहीचं जन्मला, शुध्द तो जाहला कवण प्राणी।। उत्पत्तीचे मूळ विटाळाचे स्थानं। कोण देह निर्माण नाही जगी।।’ असा मला एखादा माणूस दाखवून द्या की, जो विटाळाच्या स्थानातून जन्माला आला नाही.

आता आजही एखादा म्हणतो की, माझा जन्म जैविक नाही वगैरे, त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा हा वेगळा विषय आहे. परंतु, त्याचा भंडाफोड या आमच्या संत कवयित्रींनी १३ आणि १४ व्या शतकातमध्ये केला आहे. ज्यावेळेला लिपी आणि लिहिण्यावाचण्याला त्यांच्या जीवनात स्थान नव्हतं. स्त्री मुक्तीच्या उद्गात्या आणि झेंडा फडकवणाऱ्या म्हणायचं की नाही? म्हणजे आजच्या स्त्री मुक्तीच्या विचारांना मागे सारतील अशाप्रकारचे विचार आमच्या या स्त्रियांनी, संत स्त्रियांनी निरनिराळया जातीजमातीच्या स्त्रियांनी त्यांच्या साहित्यातून मांडल्या आहेत. त्या जातीच्या स्त्रिया ज्यावेळेला बोलतात त्यावेळेस त्यांची विचारशक्ती, प्रतिभाशक्ती आणि संवेदनशीलता, भाषेवरचं त्यांचं प्रभुत्व या सगळ्या किती मोठ्या गोष्टी आहेत असेही संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या.

प्रतिभा ही महिलांमध्ये उपजत निर्मितीच्या दृष्टीने ज्याला आपण कला म्हणत असतो ती कला म्हणजे दुसरं काय असतं ? संवेदनशीलता नेमक्या शब्दात उतरवणं, याच्यासाठी जी प्रतिभा लागते, ती प्रतिभा या बायकांच्याजवळ उपजत आहे. आणि ती अनुभवातून परिपक्व झालेली आहे. ह्यांच्याकडे आम्ही या सबंध इतिहासाच्या प्रवाहामध्ये लक्ष देणार आहोत की नाही ? असा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तो आपण लक्ष न देता पुढे चाललेले आहोत आणि आम्ही सुधारलेले आहोत असं आपण म्हणत असतो, अशा शब्दात संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी खंत व्यक्त केली.