कविता नागापुरे, लोकसत्ता
भंडारा : मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्याचे नवे पालकमंत्री कोण याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. शिवाय आता महायुतीमध्ये जिल्ह्यातील दोन आमदार असल्याने मंत्रिमंडळात व पालकमंत्रीपदी यांपैकी कुणाची तरी वर्णी लागणार आणि जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळणार अशा चर्चाही चांगल्याच रंगल्या होत्या. मात्र नवे पालकमंत्री म्हणून डॉ. विजयकुमार गावीत यांचे नाव जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
महायुतीमध्ये प्रफुल पटेलांचे पारडे जड आहे का? डॉ. फुके यांचे पंख छाटण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींनीच भाजपवासी मात्र प्रफुल पटेलांच्या जवळच्या व्यक्तीला पालकमंत्री पद दिले का ? आणि गाविताना जिल्ह्याचे पालकत्व दिल्यामुळे आता परिणय फुके यांच्या एक हाती कारभाराला लगाम लागणार का अशा चर्चांना आता ऊत आलेला आहे.
आणखी वाचा-सरकारी नोकरीच्या कंत्राटीकरणाविरोधात हजारो तरुण रस्त्यावर
राज्याच्या राजकारणात शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सामील झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारासह जिल्ह्याचे पालकमंत्री देखील बदलणार या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. राज्य सरकारने नवीन पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या केल्या यात भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नंदुरबारचे आमदार आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची वर्णी लागली आहे. आतापर्यंत भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होती. मात्र फडणवीसांनी जिल्ह्याची सुभेदारी माजी आमदार डॉ. परिणय फुके यांच्याच हाती दिली होती. त्यामुळे स्थानिक पातळीवरील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार फुके यांना साहजिकच प्राप्त झाले होते. फडणवीसांच्या वरदहस्तामुळे फुकेंना “सुपरपॉवर” मिळाली असली तरी ओबीसी मुद्द्यावर सरकार विरोधी भूमिका घेऊन फुके यांनी पक्षश्रेष्ठींनी नाराजी ओढवून घेतली आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. म्हणूनच की काय फडणवीसांच्या जवळचा व्यक्ती सोडून पटेलांच्या मर्जीतल्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
बाजार समितीच्या निवडणुकीत डॉ. फुके यांनी प्रफुल्ल पटेलांचा उजवा हात असलेल्या सुनील फुंडे यांच्याशी हातमिळवणी करून लाखनी बाजार समिती काबीज केली. मात्र वरकरणी सगळं “एकदम ओक्के” दिसत असले तरी अंतर्गत धुसफूस सुरू असून परिणय फुकें प्रफुल्ल पटेलांच्या डोळ्यात खुपू लागल्याचे बोलले जात आहे. जिल्हा कार्यकारिणी घोषित झाल्यानंतरही फुकेंनी त्यांच्या मर्जीतल्या लोकांनाच पद वाटप केल्यानंतर अनेकांनी राजीनामेही दिले. त्यात खासदार सुनील मेंढे यांच्या जवळच्या एकाही व्यक्तीला साधे तालुकाध्यक्ष पद दिले नाही म्हणून त्यांनी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा देण्यासाठी गेले असल्याची गोपनीय माहिती आहे. त्यानंतरच तातडीने पवनीचे तालुकाध्यक्ष बदलण्यात आले. त्यामुळे आता भाजप पक्षश्रेष्ठीवरील परिणय फुकेंची जादू ओसरत चाललेली आहे की काय असेही बोलले जाते. त्यातच काही दिवसांपूर्वी प्रसारित झालेल्या एका फोटोत सुनील मेंढे , सुनील फुंडे, नाना पंचबुधे, राजू कारेमोरे, प्रफुल पटेल हे सर्व एका फ्रेममध्ये असताना केवळ परिणय फूके फ्रेमच्या बाहेर होते. त्यामुळे फुकेंना त्यांची जागा दाखविली अशा चर्चा आहेत. परिणामतः जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोसो दूर अंतरावरच्या गावीत यांना देण्यात आले.
आणखी वाचा-ठकसेन जेरबंद ! फिर्यादी चंद्रपूरचा, आरोपी उमरेडचा तर कामगिरी वर्धा पोलिसांची
गावित यांना पालकमंत्री पद दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. गावित यांचा या जिल्ह्याशी दुरान्वये संबंध नसताना त्यांना पालकत्वाची जबाबदारी का दिली गेली? यावर राजकीय वर्तुळात विचारमंथन सुरू झाले. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या आणि भाजपच्या तिकिटावर नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेले डॉ. विजयकुमार गावित हे भाजपात गेले तरी प्रफुल्ल पटेलांसोबत त्यांचे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पटेलांनी त्यांचे गृह जिल्हे असलेल्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात त्यांच्याच जवळच्या व्यक्तीच्या हाती सूत्रे मिळावी यासाठी प्रयत्न केला आणि भंडाऱ्याचे पालकत्व गावित यांना देण्यात आहे. आता भाजप पक्षात असल्यामुळे ते भाजप नेत्यांचे ऐकतील की भाईजीची मर्जी राखतील हे वेळ आल्यावर कळेलच. मात्र गावितांच्या येण्याने फुके यांची मक्तेदारी संपुष्टात आल्याची चर्चा आहे. दिल्ली दरबारी प्रफुल पटेलांची चांगली चलती असल्यामुळे पालकमंत्रीच नाही तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची उमेदवारी प्रफुल्ल पटेलच ठरवतील अशीही चर्चा रंगू लागली आहे.