साहित्य दु:खाचा, वेदनेचा मार्ग दाखवणारे, चिंता वाढवणारे, मन तोडणारे नाही तर मनाला आनंद देणारे, प्रगतीचा मार्ग दाखवणारे, समाज जोडणारे, वेदनेवर मलमपट्टी करणारे तथा चिंतन करायला लावणारे असावे. या संमेलनात या सर्व गोष्टींचे चिंतन होईल, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच पुस्तकांची पूजा करण्यात आलेले हे संमेलन प्रत्येकाच्या हृदयात साहित्याची ज्योत पेटवण्याचे काम करेल, असे प्रतिपादन राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
सर्वोदय शिक्षण मंडळ, गोंडवाना विद्यापीठ व सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृतातील चंद्रपूर भूषण शांताराम पोटदुखे साहित्य परिसरात शुक्रवारी आयोजित ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक वि.स. जोग, स्वागताध्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, आमदार अभिजीत वंजारी, माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, ॲड फिरदौस मिर्झा, श्रीधर काळे, रवींद्र शोभणे, माजी आमदार सुदर्शन निमकर, श्रीराम कावळे, इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोत्रे, प्रा. अशोक जीवतोडे, प्रशांत पोटदुखे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, सूर्यांशचे अध्यक्ष इरफान शेख, सहकार्यवाह, संजय वैद्य, माजी कुलगुरू कीर्तीवर्धन दीक्षित यांची मंचावर उपस्थिती होती.
मुनगंटीवार म्हणाले, अनेक हालअपेष्टा सहन करून साहित्यिक पुस्तक लिहितो, त्याचे प्रकाशन होते. मात्र, पुस्तक विकत घेणाऱ्यांची संख्या हल्ली कमी झाली आहे. पर्यायाने वाचकांची संख्या घटते आहे. मग, साहित्य नव्या पिढीपर्यंत कसे पोहचेल, हा चिंतनाचा विषय असून बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा विचार करून भविष्यात पुस्तके नवीन पद्धतीने यावीत. चंद्रपूरचे स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या खंजिरीतून क्रांती घडली. चिमूरच्या स्वातंत्र्याची घोषणा बर्लिनच्या आकाशवाणीवरून झाली. अशा चंद्रपूर जिल्ह्यात साहित्य संमेलन होत आहे, ही सौभाग्याची गोष्ट आहे. मानसिक प्रदूषण दूर करण्यासाठी साहित्य महत्त्वाचे ठरते. त्यासाठी विदर्भ साहित्य संघावर मोठी जबाबदारी आहे. हे साहित्य संमेलन ऊर्जा देणारे केंद्र बनावे, असेही ते म्हणाले.
स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. बोकारे म्हणाले की, विदर्भातील साहित्यिकांचे योगदान निश्चितच मोठे आहे. विदर्भातील साहित्यिकांनी सदैव उत्कृष्ट व दर्जात्मक साहित्य दिले आहे. आगामी काळात नवे साहित्यिक मराठी साहित्याला गतवैभव निर्माण करून देतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संमेलनाचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी केले. डॉ. शोभणे यांनी संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला.
हेही वाचा: चंद्रपूर : ऐकावं ते नवलचं! माकडाचा दफनविधी, समाधीस्थळानंतर आता कृषी भवनात भजन किर्तन
अध्यक्षीय भाषणातून बोलताना संमेलनाध्यक्ष डॉ. वि.स. जोग म्हणाले की, इतिहास हा केवळ लाल, निळ्या, काळ्या किंवा भगव्या शाईने लिहिला जातो असे नाही. त्यामुळे इतिहास हा एका नजरेतून नाही तर दोन्ही नजरेतून वाचा. कथा, पारायणे करण्यापेक्षा साहित्य वाचा, कोणत्याही एकाच सरकारच्या हाती निरंकुश सत्ता आली की तो प्रसार माध्यमांवर नियंत्रण मिळवतो. साहित्यिकांनी सरकारच्या तुघलकी निर्णयाविरोधात सर्वप्रथम उभे राहायला हवे, अन्याय अत्याचाराविरोधात साहित्यिकांनी लढले पाहिजे. साहित्याचा राजकारण व राजकारणाचा साहित्याशी संबंध असतोच. आज खासगीकरणाच्या अतिरेकाविरोधात देशात सत्तास्थानी असलेल्या पक्षाच्या घटक संघटना स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ विरोधात उभा ठाकला आहे असेही त्यांनी सांगितले. भ्रमणध्वनीतून मिळणारे ज्ञान म्हणजे घाईघाईने जेवण. पुस्तकांपासून मिळणारे ज्ञान म्हणजे सावकाश. एकेक घास ३२ वेळा चावून जेवणे. त्यामुळे साहित्याची पुस्तके अंगी लागतात. मग ते पुस्तके स्वतंत्र असो की, संपादित असोत असे सांगितले. साहित्याच्या दृष्टीने आजचा काळ अनेक आव्हानांचा आहे. वाचन संस्कृती लोप पावत आहे, हे त्यातील एक आव्हान भ्रमणध्वनीच्या अतिरेकामुळे किंवा तारतम्य शून्य वापरामुळे असे घडते आहे. विनोबांनी ज्ञानविज्ञान, आत्मज्ञान हे साहित्याचे घटक सांगितले. व्हॉट्सअॅप, गुगल, फेसबुक यातून ज्ञान मिळेल, आत्मज्ञान मात्र मिळणार नाही, असेही डॉ. वि.स. जोग यांनी नमूद केले.
याप्रसंगी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते साहित्य व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्राचार्य मदन धनकर, डॉ. शरदचंद्र सालफळे, डॉ. अशोक जीवतोडे, बंडू धोतरे यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य धनकर यांचा सत्कार त्यांची कन्या डॉ. पद्मरेखा धनकर यांनी स्वीकारला. प्रास्ताविक डॉ. प्रमोद काटकर यांनी संचालन प्रा. रमा गोलवळकर तर आभार सूर्यांशचे अध्यक्ष इरफान शेख यांनी मानले. डॉ. पद्मरेखा धनकर वानखेडे यांच्या पसायदानाने उद्घाटन कार्यक्रमाचा समारोप झाला.
दरम्यान, सावरकर चौकातून निघालेल्या ग्रंथदिंडीत विविध शाळांचे विद्यार्थी, साहित्यिक व स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ग्रंथदिंडीचे पूजन झाले. फेटे बांधलेले विद्यार्थी, नववारीतील विद्यार्थिनी, बँड पथक यामुळे अवघा आसमंत दुमदुमून गेला. ग्रंथदिंडीत ज्ञानेश्वरी, भारतीय संविधान, ग्रामगीता यासह अनमोल ग्रंथ पालखीत ठेवण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, जिल्हाधिकारी विवेक गौडा, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, माजी कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, प्राचार्य डॉ. पी.एम. काटकर, संजय वैद्य, इरफान शेख, वि. सा. संघाचे केंद्रीय सदस्य डॉ. श्याम मोहरकर व अन्य मान्यवर यांची उपस्थिती होती. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि लेझिम पथक सर्वांचे लक्ष वेधत होते.
‘सरकार साहित्याची स्वायत्तता फ्रॅक्चर करीत आहे’
महाराष्ट्रात सध्या एका वेगळ्याच प्रकारचा वाद सुरू आहे. राज्य सरकारकडून पुरस्कार परत घेतले जात आहे. त्यामुळे व्यक्ती, अभिव्यक्ती व साहित्य क्षेत्रातील स्वायत्तत्ता फॅक्चर करण्याचे काम सरकार तथा काही राजकीय लोक करीत आहेत का, असा प्रश्न समोर येत आहे. अखिल भारतीय संमेलनासाठी ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांची निवड पक्की असताना ऐनवेळी सरकारने द्वादशीवार यांना वगळले. साहित्य संमेलनाला सरकार अनुदान देते म्हणून आम्ही जो माणूस संमेलनासाठी निवडून देतो ताेच माणूस तिथे असला पाहिजे, असा सरकारचा आग्रह आहे. यवतमाळमध्ये २०१९ मध्ये झालेल्या अ.भा. साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना निमंत्रित केले गेले होते. मात्र, सरकारची नाराजी नको म्हणून त्यांना ऐनवेळी येऊ नका, असा निरोप दिला होता. हा साहित्यिकांचा घोर अपमान आहे, असे आमदार अभिजीत वंजारी म्हणाले.