नागपूर : कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर कामठीतील ड्रॅगन पॅलेस टेंपलच्या वर्धापन दिनानिमित्त २७ आणि २८ नोव्हेंबरला ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल आयोजित करण्यात येत आहे, अशी माहिती ड्रॅगन पॅलेस टेंपलच्या संस्थापक अध्यक्षा व माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला ज्ञानेश्वर रक्षक, माजी नगरसेविका वंदना भगत, नंदा गोडघाटे उपस्थित होते.
ड्रॅगन पॅलेस फेस्टिवलमध्ये २७ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता जपान येथील आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेलोशिप असोसिएशन व निचिरेन-शु सोनेनजी विहाराचे प्रमुख भदन्त निचियु (कानसेन) मोचिदा यांच्या उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना व धम्मदेसना होईल. सुलेखा कुंभारे म्हणाल्या, फेस्टिवलचे उद्घाटन २७ नोव्हेंबरला दुपारी १.३० वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वन तथा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दोन दिवसीय ड्रॅगन पॅलेस फेस्टिवलमध्ये धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. यात इंडियन आयडल फेम राहुल सक्सेना, सारेगामा फेम राहुल भोसले यांच्या ‘बुद्ध ही बुद्ध’ हा गीतांचा कार्यक्रम होईल.
हेही वाचा – पाषाणयुगीन कलाकृतींवर नागपुरात होणार संशोधन, देशातील पहिलेच केंद्र…
ड्रॅगन पॅलेस टेंपल परिसरात १५ हजार चौरस फुटांच्या जागेवर उभारण्यात आलेल्या फूड कोर्टचे उद्घाटन २७ नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. २७ आणि २८ नोव्हेंबरला सकाळी ११ ते सायंकाळी ७ दरम्यान लघु, सूक्ष्म व मध्यम विभाग, खादी ग्राम उद्योग, हातमाग विभाग, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग असलेल्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.