वाशीम : जलपातळीत वाढ करून शेतीला सिंचनाची जोड मिळावी म्हणून शक्यतोवर उन्हाळ्यात जलसंधारणाची कामे करण्याचे संकेत आहेत. मात्र, जिल्ह्यात मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे ऐन पावसाळ्यात केली जात आहेत. बहुतांश कामाच्या ठिकाणी माहितीदर्शक फलक नसून ऐन पावसाळयात कामे होत असल्याने शेतकऱ्यात नाराजी व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील जवळपास ७६ गावात नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. ऐन पावसाळ्यात ही कामे होत असल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे. बहुतांश ठिकाणी कामाची माहिती दर्शविणारे फलक लावण्यात आलेले नाहीत. लाखो रुपये खर्चून होत असलेली ही कामे गुणवत्तापूर्ण आहेत की नाही ? याची पडताळणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी ‘ऑन दी स्पॉट’ जावून मोजमाप घेण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत किती कामे पूर्ण झाली, किती खर्च झाला आणि किती कामे अपूर्ण आहेत, याबाबतचा सविस्तर अहवालही मृद व जलसंधारण विभागाकडे नसल्याने जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
जिल्हयात नाला खोलीकरण व रुंदीकरणाची किती कामे पूर्ण झाली, किती बाकी आहेत. याचा अहवाल अजून आलेला नाही. ज्या ठिकाणी माहिती दर्शक फलक लावण्यात आले नाहीत तिथे लावली जातील.- लक्ष्मण मापारी कार्यकारी अभियंता, जल संधारण विभान, जि.प.वाशीम