लोकसत्ता टीम
नागपूर : एकविसाव्या शतकातही अंधश्रद्धेचे प्रमाण काही कमी झाले नाही. अशाच एका प्रकरणात यवतमाळ जिल्ह्यातील एका व्यक्तीला स्वप्नात दिसले की त्याच्या घरात सोने गाडलेले आहे. त्याने कामगाराच्या मदतीने खोदकाम सुरू केले. मात्र दुर्दैवाने कामगाराचा खोदकाम करताना मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी जादूटोणा कायद्याच्या अंतर्गत संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला.
हितेश रामजीभाई कारिया (रा. कारंजा लाड , जि. यवतमाळ) असे जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे. तर देवराम भाडूकले असे मृतक कामगाराचे नाव आहे.आरोपी हितेश याला स्वप्न पडले होते कीकारंजा लाड येथील घरी सोने गाडले आहे. त्यामुळे त्याने खोदकाम करण्याकरिता मृतक देवराव आणि इतर मजुरांना आणले होते. सोने मिळविण्याच्या नादात हितेशने कामगारांना खोलवर खोदकाम करायला लावले. खोदकाम करण्याच्या उत्साहात निष्काळजीपणा अंगावर भिंत पडून देवराव यांचा मृत्यू झाला.
आणखी वाचा-१४ वर्षीय मुलीचे अपहरण करून गुंडाने केला बलात्कार; जवळपास ५ ते ७ अल्पवयीन मुलींना अडकवले जाळ्यात
दारव्हा पोलिसांनी आरोपी हितेश व इतर सह आरोपीविरूद्ध जादूटोणा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीने घरी गाडलेले सोने काढण्याकरिता देवराव यांना खोदकाम करण्यासाठी बोलविले होते. या खोदकामादरम्यान देवराव यांच्या अंगावर भिंत पडून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपीचा निष्काळजीपणा असला तरी आरोपीला ताब्यात घेण्याची गरज नाही, असा युक्तिवाद आरोपीच्यावतीने करण्यात आला. सरकारी पक्षाने जामिनाला विरोध करताना सांगितले की आरोपी गैरकायदेशीर कृत्यात सहभागी आहे. आरोपीने घरी सोने शोधण्याकरिता खोदकाम केले आहे. आरोपीच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असून खोदकाम करताना देवराव यांच्या अंगावर भिंत पडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोपीच्या चौकशीचा गरज आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार आहे. त्यामुळे आरोपीला जामीन देवू नये, अशी विनंती सरकारी पक्षाने न्यायालयात केली.
दरम्यान आरोपीने केवळ सोने शोधण्यासाठी व खोदकाम करायला देवराव यांना बोलविले होते. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून यात नव्याने चौकशी करण्यासाठी काही नाही असे म्हणत न्यायालयाने आरोपीला अटींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला. आरोपीने आठवडयातून प्रत्येक सोमवारी सकाळी १० ते दुपारी १ यादरम्यान संबंधित पोलीस ठाण्यात हजर राहायचे आहे. आरोपीच्यावतीने अॅड. आय.डी.ठाकरे यांनी बाजू मांडली. राज्य शासनाच्यावतीने ॲड.एस.हैदर यांनी युक्तिवाद केला.
© The Indian Express (P) Ltd